आयरीश यांचे राष्ट्रपतींसह पंतप्रधानांनाही पत्र
प्रतिनिधी/ पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मंत्रीमंडळाच्या शपथविधी सोहळ्यावर करण्यात आलेल्या 5.59 कोटी खर्चाच्या चौकशीसाठी ’पॅग’ ला निवेदन दिल्यानंतर ऍड. आयरीश रॉड्रिग्स यांनी आता थेट राष्ट्रपतींनाच पत्र लिहून त्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. याच पत्राची प्रत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पाठविली आहे.
बांबोळी येथील शामाप्रसाद स्टेडियममध्ये दि. 28 रोजी झालेल्या या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसह आठ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री व अधिकारी उपस्थित राहिले होते. या सोहळ्यावर तब्बल 5.59 कोटी 25 लाख रुपये खर्च करण्यात आला होता, ही बाब आरटीआय माहितीतून उघड झाली होती.
प्रत्यक्षात विधानसभा निवडणुकीपूर्वीच काही दिवस अगोदर राजभवनवर अत्याधुनिक दरबार हॉलचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी त्याच सभागृहात होईल, असे जाहीर करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र तो सोहळा शामाप्रसाद स्टेडियमवर आयोजित करून त्यावर अवाढव्य खर्च करण्यात आला.
त्याशिवाय स्टेडियमचे भाडे, व्हीव्हीआयपी सुरक्षेसाठी भाडोत्री गाडय़ा, विविध प्रसिद्धी माध्यमांतून करण्यात आलेल्या जाहिराती, लोकांना कार्यक्रमस्थळी नेण्यासाठी वापरलेल्या बसेस आदी खर्चाचा समावेश नाही. ही सर्व रक्कम एकत्रित केल्यास सुमारे 7 कोटी रुपये खर्च केल्याचे स्पष्ट होत आहे. हा सोहळा दरबार हॉलमध्ये माफक खर्चात आयोजित करता आला असता, असे आयरीश यांनी म्हटले आहे.
राज्याच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. कर्मचाऱयांचा पगार घालण्यासाठी सुद्धा सरकार दरमहा कर्ज काढते. समाजकल्याण योजनांच्या लाभार्थ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून त्यांचा मासिक आधार देणे सरकारला जमलेले नाही. ही दुःखद परिस्थिती पाहता शपथविधीवर कोटय़वधी रुपये अत्यंत बेपर्वाई व विनाकारण खर्च करण्यात आल्याचे स्पष्ष्ट होत आहे. सार्वजनिक निधीचा हा अक्षम्य गुन्हेगारी अपव्यय होता, हेच स्पष्ट होत आहे.
हा एकूण प्रकार पाहता अशाप्रकारे सार्वजनिक निधीच्या प्रचंड अपव्ययासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई होण क्रमप्राप्त आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी या संशयास्पद प्रक्रियेबद्दल गोवा सरकारकडे स्पष्टीकरण मागावे, अशी मागणी आयरीश यांनी केली आहे.









