एर्दोगान यांच्या चुकीच्या धोरणांनी जनता बेहाल
वृत्तसंस्था / अंकारा
तुर्कस्तानात महागाईने विक्राळ स्वरुप धारण केले आहे. एप्रिलमध्ये वार्षिक महागाई दर वाढून 70 टक्क्यांपर्यंत पेहोचला आहे. महागाईतील ही वाढ पूर्वानुमानापेक्षा खूपच अधिक आणि दोन दशकांमधील उच्चांकी स्तरावर आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि मागील वर्षी तुर्कस्तानचे चलन लीरा कोसळल्याने महागाईचा आगडोंब उसळला आहे. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसप तैयप एर्दोगान यांच्यासाठी महागाई एक मोठे आव्हान ठरले आहे.
स्वतःच्या अयशस्वी आर्थिक धोरणांमुळे एर्दोगान यांच्यावर टीकेचा भडिमार होत आहे. ग्राहक मूल्य निर्देशांक एप्रिलमध्ये 69.97 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा आकडा 61.14 टक्के राहिला होता, असे तुर्कस्तानच्या नॅशनल स्टॅटिक्स एजन्सीने सांगितले आहे. वाढत्या किमती कमी करण्यासाठी व्याजदरांमध्ये मोठी कपात करण्याची गरज असल्याचे एर्दोगान यांनी म्हटले आहे. चलनाचे मूल्य खालावल्याने ऊर्जा आयातीचा खर्च वाढला असून विदेशी गुंतवणूकदार देखील आता तुर्कस्तानपासून अंतर राखू लागले आहेत.









