करमाळा प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यात केळीचे मोठे उत्पादन झाले असून या केळीला आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत मिळवून देण्यासाठी राज्य शासन महत्त्वाचे निर्णय घेणार असून लवकरच या बाबतीत आपण सोलापूर जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकर्यांचा मेळावा घेणार असल्याचे आश्वासन कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, आजिनाथ विरकर, निलेश चव्हाण, राजेंद्र मिरगळ, श्रीकांत पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयात कृषी मंत्री दादा भुसे यांची भेट घेण्यात येऊन त्यांना करमाळ्याला येण्याचे आमंत्रण देण्यात आले. यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाची पक्षप्रमुख मंगेश चिवटे, कृषिभूषण व राष्ट्रपती पदक विजेते प्रकाश सिंह सूर्यवंशी उपस्थित होते.
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या यांच्या पुढे मांडून केळीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून द्यावी शिवाय विद्राव्य खतासाठी अनुदान द्यावे अशा मागणीचे निवेदन दिले.
विद्राव्य खताचे दर दुपटीने वाढले असून त्यामुळे केळी उत्पादन खर्च वाढला आहे. विशेषता ठिबक सिंचन वर घेण्यात आलेल्या फळपिकांसाठी भाजीपाला पिकांसाठी विद्राव्य खताची आवश्यकता असते. जे शेतकरी ठिबक सिंचन घेऊन पाण्याची बचत करतात त्यांना खतासाठी अनुदान मिळत नाही. उलट पाटपाण्याने पाणी देऊन पाण्याचा अपव्यय करणारे शेतकरी रासायनिक खताच्या अनुदानाचा लाभ उठवत आहेत .ही बाब मंत्रीमहोदयांच्या लक्षात आणून दिली.
यावेळी लवकरच सोलापूर जिल्ह्यात केळी उत्पादक, भाजीपाला, फळबागा शेतकर्यांचा मेळावा घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेऊन समस्या व मार्ग काढू व मदत करू असे कृषी मंत्री दादा भुसे यांनी आश्वासन दिले