कोल्हापूर; गोकुळमध्ये सत्तांतर होऊन एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने आज गोकुळ संचालिका शौमिका महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे घणाघात केला. रमजान ईद मध्ये गोकुळ दूध संघाने दुधाची मोठी विक्री केली त्यांचे मी अभिनंदन करतो. चांगल्या गोष्टीला चांगले म्हंटले पाहिजे, हि महाडिकांची शिकवण आहे. चांगल्या गोष्टीत खोड्या घालायला मी पाटील नाही महाडिक आहे. तर जमिनी बळकावण्यात एक व्यक्त फेमस आहे. देव मेला म्हणून देवस्थानच्या जमिनी लाटल्या आणि साम्राज्य उभं केलं. अशी बोचरी टीका शौमिका महाडिक यांनी केली. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
महाडीकांना बदनाम करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न
आज गोकुळ मधील सत्ताधाऱ्यांना वर्ष झाले. वर्षभरात अनेक गैरकारभार गोकुळमध्ये झाला. गोकुळमध्ये कारभार चुकीचा आणि हुकूमशाही पद्धतीने सुरू आहे. गोकुळच्या निवडणुकीत महाडीकांच्या टँकर वरील मुद्दा पुढे करण्यात आला. पण ज्यावेळी मी हा विषय सभेत मांडला, त्यावेळी मात्र व्यंकटेश्वरा कडून स्पष्टीकरण आले की ,एक रुपयांचा ज्यादा दिला नाही. मी अनेक विषयांबाबत पाठपुरावा करत आहे. मात्र सध्या अधिकाऱ्यांच्यावर दबाव आहे, तुमचा कारभार स्वच्छ असेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. कुठंतरी पाणी मुरतंय म्हणून अधिकाऱ्यांना माहिती देऊ नये असे सांगितले जातंय. तुम्ही महिलांच्या सन्मानाची गोष्ट बोलताय तर, गोकुळ निवडणुकीत एका महिलेला हरवण्यासाठी का प्रयत्न केले? गोकुळच्या निवडणुकीत केवळ महाडीकांना बदनाम करून सत्ता मिळवली. असा घणाघात शौमिका महाडिक यांनी केला. तुम्ही निवडणुकीत तीस वर्षाचा हिशोब मागत होता. तीस वर्षाचा हिशोब हवा असेल तर आमचे महारथी तुमच्यात आहेत त्यांना विचारा. निवडणुकीत लोकांना किती आश्वासने दिली? किती पूर्ण केली त्याची उत्तर द्या? असा सवाल महाडिक यांनी केला.
देव मेला म्हणून देवस्थानच्या जमिनी लाटून साम्राज्य उभा केलं
मुंबईत जागा खरेदी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र एक व्यक्ती जमिनी लाटण्याचा प्रकारात जास्त फेमस आहे. देव मेला म्हणून देवस्थानच्या जमिनी लाटल्या आणि साम्राज्य उभं केलं. आता तोच प्रकार सुरु आहे. असा आरोप शौमिका महाडिक यांनी केला. एव्हढं करूनही ते भागले नाहीत. ओपन टेंडर प्रक्रियेत अनेक नियम घातले. घातलेले नियम संघाच्या फायद्याचे नाहीत. हे नियम संघाच्या हितासाठी की स्वतःच्या हितासाठी आहेत हेच कळत नाही. टेंडर प्रक्रियेची आमच्यासमोर पाकीट फोडली पण आत बसून वेगळी प्रक्रिया राबवली. टेंडर पास करणे हे चेअरमनच्या हातात, पण इथे वेगळा व्यक्ती ठरवतो, मग हीच का तुमची लोकशाही? असा सवाल महाडिक यांनी केला आहे. या प्रकारामुळे वैयक्तिक कोणाचे नुकसान नाही मात्र भविष्यात संघाचे मोठे नुकसान आहे? असे शौमिका महाडिक म्हणाल्या.
दूध दरवाढ ही दरवर्षी देत असतो, ग्राहकांवर बोजा टाकून ही दरवाढ केली. २०१७ ला हाच प्रश्न पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला होता. त्यामुळे तुम्ही किती काटकसर केली हे जाहीरपणे सांगावे, या खुल्या व्यासपीठावर या आणि सांगा ! पालकमंत्री सतेज पाटलांना शौमिका महाडिक यांनी जाहीर आव्हान दिलं आहे. उत्तरच्या निवडणुकीत ही दरवाढ थांबवली, मुंबई- पुणे याठिकाणी दरवाढ करून ग्राहकांवर बोजा टाकला. पण कोल्हापुरात मात्र उत्त पोटनिवडणूक झाल्यावर ही दरवाढ केली. त्यांना पराभवाची भीती होती. असा टोला शौमिका महाडिक यांनी लगावला.
चांगल्या गोष्टीत खोड्या घालायला मी पाटील नाही महाडिक आहे
काल झालेल्या रमजान ईद मध्ये गोकुळ दूध संघाने दुधाची मोठी विक्री केली. त्यांचे मी अभिनंदन करतो. चांगल्या गोष्टीला चांगले म्हंटले पाहिजे, हि महाडिकांची शिकवण आहे. चांगल्या गोष्टीत खोड्या घालायला मी पाटील नाही महाडिक आहे. अशी बोचरी टीका शौमिका महाडिक यांनी केली. मात्र मागील तीन महिन्यात दुग्धजन्य पदार्थात प्रचंड घटझाली आहे. त्याचे उत्तर मला मिळालेली नाहीत. अधिकाऱ्यांच्यावर दबाव आहेत, निर्णय घेण्याचे अधिकाऱ्यांना अधिकार नाहीत.असा आरोप शौमिका महाडिक यांनी केला.