पहाटेची भोंग्यावरील अजान केली बंद
गडहिंग्लज प्रतिनिधी
गडहिंग्लज शहराची सामाजिक व सांस्कृतिक एकतेची परंपरा लक्षात घेत मुस्लिम समाजाने रात्री 10 ते पहाटे 6 वाजेपर्यंत भोंग्यावरील अजान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील सुन्नी जुम्मा मस्जिदचे सचिव प्रा. आशपाक मकानदार, मरकज मस्जिदीचे प्रमुख कबिर मुल्ला, मदीना मस्जिदचे प्रमुख मौलाना अजिम पटेल, मरकज मस्जिदचे ट्रस्टी हारुण सय्यद यांनी याबाबतचे पत्रक प्रसिध्दीस दिले आहे.
गडहिंग्लज हे शांतताप्रिय आणि सुसंस्कृत शहर आहे. येथील सामाजिक सलोखा हा इतरांसाठी आदर्शवत, प्रेरणादायी व अनुकरणीय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत आपल्यामुळे इतरांना त्रास होवू नये या इस्लाम धर्माच्या शिकवणीनुसार शहरातील सुन्नी जुम्मा मस्जिद, मोहम्मदीया अरबी मदरसा (मरकज मस्जिद), मदीना मस्जिद येथे पहाटेची अजान भोंग्यावरुन न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून करण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले आहे. सध्या मस्जिदीवरील भोंग्याचा वाद चर्चेचा असताना गडहिंग्लज येथील मुस्लिम समाजाने निर्णय घेत भोंग्यावरील पहाटेची अजान बंद केले आहे. हा जिल्ह्य़ातील पहिला निर्णय असल्याचे याची चर्चा होते आहे.