ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यात भोंग्यांवरून वातावरण तापलं (Maharashtra Loudspeaker Controversy) असून आज मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. यावेळी मुंबई पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतलं. पण, मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाले. यामध्ये एक महिला पोलीस अधिकारी देखील जखमी झाल्या आहेत. संदीप देशपांडेंना पळून जाणं महागात पडणार आहे. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मुंबई पोलिसांना कारवाई केसाचे आदेश दिले आहेत.
दरम्यान गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. ‘मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आज मुंबई पोलीस दलातील महिला अधिकारी यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाबद्दलची माहिती मी घेतली आहे. सदरच्या घडलेल्या गंभीर प्रकाराबद्दल तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले आहेत, असं शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.
संदीप देशपांडे हे मनसेच्या प्रत्येक आंदोलनात आघाडीवर असतात. भोंग्यांच्या विरोधात आज होत असलेल्या आंदोलनासाठीही ते रस्त्यावर उतरले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानाबाहेर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व पोलीस गाडीत बसवण्यासाठी घेऊन जात होते. संदीप देशपांडे यांनी आम्ही तुमच्यासोबत येत असल्याचं पोलिसांना सांगितले. काही अंतर पोलिसांसोबत चालत गेल्यानंतर अचानक हे दोघेही खासगी कारमध्ये बसले आणि कार भरधाव निघून गेली. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही उपयोग झाला नाही. या सगळ्या गडबडीत एक महिला पोलीस जखमी झाली आहे.