वार्षिक शट डाऊन असताना घडला दुर्दैवी अपघात : टाकी हाताळताना आवश्यक होते थंड वातावरण
प्रतिनिधी /वास्को
झुआरीनगर सांकवाळ येथील झुआरी ऍग्रो केमिकल्स उद्योगातील युरिया प्लान्टवर बंद स्थितीतील अमोनिया टाकीच्या स्फोटात तिघा कामगारांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत मृत्यू आलेल्या कामगारांची नावे इंद्रजित घोष (32, कोलकाता), मृत्यूंजन चौधरी (28, कोलकाता) व कश्करण सिंग (40, बिहार) अशी असून त्यांना वास्कोतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानंतर मृत घोषीत करण्यात आले. गॅस कटरमुळे आगीची ठिणगी पडून हा स्फोट झाल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालेले आहे.
झुआरी ऍग्रो केमिकल्समध्ये युरिया प्लान्टवर हा स्फोट झाला. हा प्लान्ट 1 तारखेपासून देखभालीच्या कामासाठी बंद ठेवण्यात आलेला होता. देखभालीची ही प्रकिया वार्षिक असते. पूर्ण महिनाभर हा प्लान्ट देखभालीसाठी बंद ठेवण्यात येत असतो. ही प्रक्रिया म्हणून गेल्या तीन दिवसांपासून या प्लान्टच्या देखभालीचे काम चालू होते. या उद्योगातील डीएपी प्लान्ट सुरळीत चालू आहे. एनपीके प्लान्ट बराच काळ बंद आहे. दोन्ही चालू प्लान्टबाबत हल्ली कशाच प्रकारची तक्रार नव्हती. खत निर्मितीची ही यंत्रणा सुरळीत होती.
वार्षिक शट डाऊन असताना अपघात
वार्षिक देखभालीसाठी शट डाऊन करण्यात आलेले असताना काल दुपारी हा दुदैर्वी अपघात घडला व त्यात तिघे कामगार जागीच ठार झाले. ही घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली तरी घटनेची वार्ता साधारण दोन तासांनंतरच बाहेर पडली. त्यामुळे काही वेळ खळबळ निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच जवळचे अग्निशामक दल, मुरगावचे उपजिल्हाधिकारी दत्तराज गावस, पोलीस उपअधीक्षक नीलेश राणे व वेर्णातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कारखाने व बाष्फक खात्याच्या अधिकाऱयांनीही घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली. या घटनेमुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही घटनास्थळी दाखल झाली. संबंधीत विभागाना खबरदारीच्या व सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. परंतु सदर प्लान्ट बंद असल्याने या घटनेचा परिणाम कंपनीतील इतर कुठल्याही यंत्रणेवर झाला नाही.
टाकी हाताळताना असायला हवे थंड वातावरण
झुआरी ऍग्रो केमिकल्समधील युरिया प्लान्टवर झालेल्या या दुर्घटनेसंबंधी मिळालेल्या माहितीनुसार ही घटना प्लान्टवरील अमोनिया टाकी खोलताना त्या कामगारांकडून निष्काळजीपणा झाल्याने घडल्याचे दिसून आलेले आहे. ही टाकी खोलण्याचा प्रयत्न करताना जी खबरदारी घ्यायला हवी होती, ती घेण्यात आलेली नव्हती. सदर टाकीला कंडोनसेशन टँक असे म्हटले जाते. ही टाकी काही दिवस बंद होती. तरीही त्या टाकीत काही प्रमाणात वायुचे अंश होते. ही टाकी हाताळताना किंवा तिची दुरूस्ती किंवा अन्य काही करताना थंड वातावरण असायला हवे. थंड अवजारांचा वापर करायला हवा. मात्र कामगारांनी गॅस कटरचा वापर केल्यामुळे तेथील उष्णता वाढली आणि परिणामी हा स्फोट झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
वेर्णा पोलीस या घटनेनंतर काही तास कंपनीच्या आवारातच ठाण मांडून चौकशीत व्यस्त होते. या औद्योगिक दुर्घटनेची पोलीस सखोल चौकशी करीत आहेत. यात कोण कोण दोषी आहेत हे पुढील चौकशीत स्पष्ट होणार आहे.
गॅस कटरच्या वापरामुळे उष्णता वाढून झाला स्फोट
युरिया प्लांटची सदर टाकी हाताळताना कामगारांना त्या टाकीचे नट बोल्ड खोलणे शक्य झाले नसल्याने त्यांनी त्यासाठी अखेर गॅस कटरचा वापर केला. त्यामुळे उष्णता वाढल्याने टाकीत असलेल्या वायूच्या अंशाने पेट घेतला. या आगीच्या ठिणगीमुळे शेवटी तिनशे क्युबिक मीटर क्षमतेच्या या अमोनिया टाकीचा स्फोट होऊन तिघेही कामगार त्या टाकीवरून तीस मीटर दूरवर फेकले जाऊन जागीच ठार झाले. खाली असलेला एक कामगार मात्र, सुखरूप बचावला. चौघेही कामगार कंत्राटदाराकडे काम करणारे असून या कंत्राटी कामगारांना फारशी सुरक्षा नव्हती असे दिसून आलेले आहे.
घटनेस जबाबदार संबंधितांना अटक करण्यात येईल : राणे
ही औद्योगिक दुर्घटना निष्काळजीपणामुळेच घडल्याचे पोलीस उपअधीक्षक नीलेश राणे यांनी स्पष्ट केले आहे. ती टाकी खोलण्याचे काम चुकीच्या पध्दतीने व आवश्यक खबरदारी न घेता करण्यात येत होते. त्यामुळे आगीची ठिणगी पडून स्फोट झालेला आहे. सदर प्लान्टच्या देखरेखीचे काम झुआरी ऍग्रो केमिकल्स लिमिटेडने रत्नागिरीच्या बुखारो मेकानिकल्स वर्क्स या आस्थापनाला दिले होते. मात्र, त्यांच्याकडूनही निष्काळजीपणा झाल्याचे दिसून आलेले आहे. पोलिसांनी यासंबंधी एफआयआर नोंद केलेली असून अधिक चौकशीअंती संबंधितांना अटक करण्यात येणर असल्याचे उपअधीक्षक राणे यांनी म्हटले आहे.









