प्रा. सुभाष वेलिंगकर यांचा आरोप : झेवियरनेच गोव्याच्या समाजाची शकले पाडली,हिंदू महारक्षा आघाडीतर्फे ’गोवा फाईल्स’ प्रदर्शन

प्रतिनिधी /पणजी
ख्रिस्ती लोक हे आमच्या रक्ताचे बंधू, भगिनी आहेत. बाटाबाटीपूर्वी दोन्ही समाजांचे पूर्वज एकच होते. दोघांचीही कुलदैवते, चालिरिती, आडनावे समान होती याचे दाखले आहेत. अशावेळी आम्ही ख्रिस्ती समाजाच्या विरोधात जाणे शक्यच नाही. या दोन्ही समाजांची शकले पाडली ती फ्रान्सिस झेवियर याने. जगाच्या पाठीवर आजपर्यंत कुठेच घडलेला नाही एवढा धर्मच्छळ त्याने केला. हिटलरलासुद्धा लाजवेल अशा प्रकारचे अनन्वित अत्याचार पोर्तुगीजांनी गोमंतकीयांवर केले, असे निवेदन भारत माता की जय संघटनेचे राज्य संचालक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले.
हिंदू महारक्षा आघाडीतर्फे पणजीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे, सुराज्य संस्थेचे संस्थापक डॉ. सुरज काणेकर, प्रविण नेसवणकर, गोमंतक मंदिर महासंघाचे चंद्रकांत भाई, सौ. शुभा सावंत, संदीप पाळणी, आदींची उपस्थिती होती. परशुराम जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आमच्या कार्यास परमेश्वराचे अधिष्ठान आहे. त्यामुळे कोणतीही ताकद आम्हाला रोखू शकणार नाही. त्याच परमेश्वरी आशीर्वादाच्या बळावर हाती घेतलेले कार्य तडीस नेल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
हिंदुंनी कधीही भावना दुखावल्या नाहीत
पुढे बोलताना श्री. वेलिंगकर यांनी, गोवा फाईल्ससंबंधी एकही विरोधक काहीच बोलत नाही, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. हिंदू समाजाने कधीच जातीय सलोखा बिघडविलेला नाही. हिंदूनी कुठेही दंगली केल्याचे उदाहरण नाही. सीआयडी अहवालात सुद्धा तसा उल्लेख नाही. काही विघ्नसंतोषी लोक या अशा अफवा पसरवत आहेत. आता सुद्धा आम्ही ख्रिस्ती समाजाच्या भावना भडकवत असल्याचा आरोप करून रासुकाखाली अटक करण्याची मागणी होत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. आम्ही कोणत्याही ख्रिस्ती समाजबांधवाच्या भावना दुखावलेल्या नाहीत. याउलट ते आमच्या रक्ताचे बंधू भगिनी आहेत, असे आम्ही वारंवार सांगत आलो आहे. बाटाबाटीपूर्वी त्यांचे आणि आमचे पूर्वज एकच होते याचे दाखले आहेत. त्यातून दोघांच्याही अनेक चालिरिती समान आहेत. त्यांची आडनावे, कुलदैवते समान आहेत. त्यामुळे ख्रिस्ती समाजबांधवांच्या विरोधात आम्ही जाण्याचा प्रश्नच येत नाही.
जगाच्या पाठीवरील सर्वांत मोठा छळ
तरीही काही विकृत आणि पोर्तुगालधार्जीणे लोक ही विकृती पसरवत आहेत. पोर्तुगिजांनी 450 वर्षे राज्य केले. त्यातील तब्बल 247 वर्षे हिंदु आणि ख्रिस्ती बांधवांच्या पूर्वजांनी अतोनात धर्मच्छळ सहन केले. जगाच्या पाठीवर आजपर्यंत एवढा धर्मच्छळ घडलेला नाही. हिटलरलासुद्धा लाजवेल अशा प्रकारचे अनन्वित अत्याचार पोर्तुगिजांनी या 247 वर्षात हिंदू आणि ख्रिस्ती गोमंतकीयांवर केले. खरे तर गोवा मुक्तीनंतर हिंदू ख्रिस्ती समाजामधील हे भावबंध वाढविण्याची, अधिक दृढ करण्याची गरज होती.
गोव्यात इन्क्विझीशन होण्यापूर्वी स्पेन आणि पोर्तुगालमध्ये अशाप्रकारचे इन्क्विझीशन होते. स्पेनमध्ये चर्च आणि पाद्रीनी यहुदींचा प्रचंड नरसंहार केला हा इतिहास आहे आणि त्याचे लेखी पुरावे आहेत. फ्रान्सिस झेवियरला काहीजण संत म्हणतात त्याबद्दल कुणाचाही आक्षेप नाही. जास्तीत जास्त धर्मांतरे करण्याच्या नावावर चमत्कार खपवून त्याला संतपद देतात आणि रोम त्यावर शिक्कामोर्तब करते. परंतु आम्ही त्याला संत म्हणणार नाही. कारण आमच्या पूर्वजांवर अत्याचार करण्यास हाच झेवियर जबाबदार होता. गोव्यावर इनक्विझीशन लादण्यास सर्वस्वी जबाबदार आहे तो संत म्हणविणारा फ्रान्सिस झेवियर आहे, याचे पुरावे खुद्द पुर्तुगालच्या संग्रहालयात पत्रांच्या रुपात उपलब्ध आहेत, असे वेलिंगकर यांनी सांगितले.
आम्ही जे सांगतो, तो इतिहासच!
आज झेविरयबद्दल मी जे काही बोलतो ते यापूर्वीच अ. का. प्रियोळकर तसेच गोव्याच्या राष्ट्रवादाचे जनक म्हणून ज्यांच्याकडे आम्ही आदराने पाहतो ते स्व. टी. बी. कुन्हा यांनी आपल्या ऐतिहासिक पुस्तकांमधून लिहून ठेवले आहे. त्यामुळे झेवियरने केलेले छळ हे गोवा आणि गोमंतकीयांच्या हितासाठीच होते, असे म्हणण्याएवढी आमची बुद्धी भ्रष्ट झालेली नाही. झेवियरने जे केले ते पोर्तुगिज साम्राज्याच्या हितासाठी केले. गोव्याचे नव्हे. अशा व्यक्तीला ’गोंयचो सायब’ म्हणणे म्हणजे स्वतःच्या मातेवर लैंगिक अत्याचार करणाऱयाची आरती ओवाळण्यासारखे आहे, असे वेलिंगकर म्हणाले.
60 वर्षांपूर्वी गोवा पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त झाला आहे. तो भारताचा भाग झाला आहे. त्यामुळे राज्य, राष्ट्र आणि आपल्या पूर्वजांबद्दल स्वाभीमान बाळगणाऱया हिंदू तसेच ख्रिस्ती समाजाने झेवियरला संत म्हणणे थांबविले पाहिजे, विकृत मानसिकतेचे काही दूत, पोर्तुगिजांचे दलाल आजही गोव्यात वावरत आहेत. त्यांच्यापासून गोवा वाचविला पाहिजे, असे आवाहन वेलिंगकर यांनी केले.
सामाजिक सलोखा सांभाळण्याची जबाबदारी केवळ हिंदूंचीच काः शिंदे
सामाजिक सलोखा सांभाळण्याची जबाबदारी केवळ हिंदूंवरच आहे का असा सवाल रमेश शिंदे यांनी उपस्थित केला. भारतात 80 टक्क्यांपेक्षा जास्त हिंदू राहत असतानाही मशिदींवर दिवसातून पाच वेळा लाऊडस्पिकर वाजवून अजान पढला जातो. या लाऊटस्पीकरविरोधात सर्वोच्च न्यायालयासह भारतातील 16 न्यायालयांनी निवाडे दिलेले आहेत. परंतु सरकार कोणतीही कारवाई करत नाही. हा कोणता न्याय? आणि कोणती धर्मनिरपेक्षता आहे? आश्चर्यकारक प्रकार म्हणजे एखाद्या हिंदूने लाऊडस्पीकरविरोधात बोलले की लगेच धार्मिक सलोखा बिघडवत असल्याचा आरोप होतो.
गोमंतकीयांचे अनन्वित छळ आणि प्राणांतिक अत्याचार करणाऱया फ्रान्सिस झेवियरबद्दल बोलायचे झाल्यास, गोमंतकीयांनी त्याला ’गोव्याच्या रक्षणासाठी’ निमंत्रण देऊन बोलावून घेतले होते का? म्हणून त्याला ’संत’ संबोधले जात आहे का? असे सवाल शिंदे यांनी उपस्थित केले.
स्वतःवरील अत्याचारांबद्दल आम्ही असंवेदनशील का?
गोव्यात हिंदूवर झालेल्या अत्याचाराच्या फोटोंचे प्रदर्शन फ्रान्समधील एक व्यक्ती भरविते यावरून आम्ही स्वतःवरील अत्याचांराबद्दल आम्ही किती असंवेदनशील, दुर्लक्षित आहोत याचे हे सगळ्यात मोठे उदाहरण. आमच्यावर अत्याचार झाले होते हे आम्ही नीटपणे ओरडून सांगू सुद्धा शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. कारण तेथे लगेच अल्पसंख्यांच्या भावनांचा प्रश्न उपस्थित करण्यात येतो. भारत हे जगातील एकमेव राष्ट्र असेल जेथे अल्पसंख्यांकाकडून बहुसंख्यांकांवर अत्याचार करण्यात येतात, असेही शिंदे यांनी सांगितले.
व्यासपीठावरील अन्य मान्यवरांनीही विचार व्यक्त केले. गोविंद चोडणकर यांनी स्वागत आणि मान्यवरांचा परिचय करून दिला. मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय बजरंग दलाचे अध्यक्ष नितीन फळदेसाई यांनी सुत्रसंचालन केले.
प्रोग्रेससिव्ह प्रंटवर बंदी घालण्याची मागणी
प्रमोद मुतालीक यांच्यावर बंदी घालण्याचा निर्णय गोवा सरकार स्वतः घेऊ शकते, तर त्याच अधिकारातून प्रोग्रेसिव्ह फ्रंटवर बंदी का घातली जात नाही. ती मागणी केंद्राकडे का करण्यात येते? असा आश्चर्य व्यक्त करणारा सवाल वेलिंगकर यांनी केला. गोवा सरकारने स्वतः निर्णय घेऊन प्रोग्रेसिव्ह फ्रंटवर बंदी घालावी, आम्ही तुमच्या मागे सदैव राहू, असे आश्वासन वेलिंगकर यांनी दिले. मोठय़ा संख्येने उपस्थित जनसमुदायाने टाळ्यांच्या गडगडाटात त्यांना पाठिंबा दिला. त्याचबरोबर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या ’गोव्यात धर्मांतरे सहन करणार नाही’ या घोषणेचे सर्वांनी स्वागत केले.









