प्रतिनिधी/ सातारा
भोंग्यावरून सातारा शहरात कोणताही वाद निर्माण न होता येथील सलोख्याचे वातावरण कायम आबाधित ठेवण्यासाठी तरूण भारतने पुढाकार घेत सलोखा परिषद घेतली. या परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित महाआरतीत सर्व धर्मांच्या लोकांनी सहभाग होण्याचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला प्रतिसाद देत महाआरतीत हिंदू, मुस्लिम, बौद्ध तसेच इतर धर्मातील लोकांनी हजेरी लावली. यावेळी भारत माता की जय, वन्दे मातरम, हम सब एक है असा नारा देण्यात आला.
साडेतीन मुहूर्तापैकी एक असणाऱया अक्षयतृतीया आणि रमजान ईद हे सण एकाच दिवशी आल्याने हिंदू तसेच मुस्लिम बांधवाचा आनंद द्विगुणीत झाला. या आनंदात महाआरतीने आणखी भर पडली. गेल्या काही दिवसपासून भोंग्यावरून सुरू असलेल्या वादात सामाजिक व धार्मिक वातावरण ढवळून निघु नये म्हणून तरूण भारतने पुढाकार घेवून सलोखा परिषद घेतली. या सलोखा परिषदेत साताऱयातील सर्व धर्म समभावाचे दर्शन घडले. हा सलोखा असाच कायम ठेवण्यासाठी मनसे कडून आयोजित महाआरतीला सर्वांनी एकत्र येण्याचा निर्धार केला होता. ही महाआरती रद्द करण्यात आल्याची अफवा ही वाऱयासारखी पसरली होती. परंतु मंगळवारी सकाळपासून शहरात महाआरती संपन्न होणार हे कळताच अनेकांनी हजेरी लावायला सूरूवात केली. मंदिराबाहेर भक्तांची तसेच विविध संघटना, पक्षाच्या पदाधिकाऱयांनी गर्दी केली. यावेळी सामाजिक भान ठेवत नियमांचे पालन करण्यात आले.
पोलिसांनी ही चोख बंदोबस्त ठेवला होता. आरतीवेळी तरूण भारतचे आवृत्ती प्रमुख दिपक प्रभावळकर, मुक्तार पालकर, रिपाइंचे किशोर गालफाडे, शिवराज्यअभिषेक दिन उत्सव समितीचे सुदामदादा गायकवाड, मनसेचे जिल्हाध्यक्ष युवराज पवार, शहराध्यक्ष राहूल पवार, महिला आघाडीच्या वैशाली शिरसागर, जिल्हा सचिव अश्विन गोळे, उपजिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, सहकार सेना संघटक अमोल घरज, वाहतूक सेना जिल्हा संघटक राहूल शेडगे, जावली तालुका अध्यक्ष अविनाश दुर्गावळे, महाबळेश्वर तालुका अध्यक्ष राजेंद्र बावळेकर, पाचगणी तालुका अध्यक्ष नितीन पार्टे, खंडाळा तालुका अध्यक्ष अविष्कार भरगुडे, कोरेगाव तालुका अध्यक्ष सागर बर्गे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष रोशन भोसले व पदाधिकारी उपस्थित हेते. सर्वांनी हातात आरतीचे ताट घेवून आरती केली. आरती करून सर्वांनी मारूती देवाचे दर्शन घेत सातारा शहरात असाच सलोखा कायम ठेवण्याचे वचन एकमेकांना दिले.
गळाभेट अन् फटाक्यांची झाली आतिषबाजी
महाआरती संपन्न होताच हिंदू-मुस्लिम बांधवानी गळभेट घेवून एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करत होते. महाआरतीला आलो आता शीरखुर्म्याला या असे निमंत्रण ही देण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती. हे पाहून दिवाळी सणाची आठवण झाली. या आतिषबाजीमुळे अनेकांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते. साताऱयातील सलोखा कायम ठेवण्यासाठी सर्वांनी घेतलेल्या या पुढाकारचा विजय झाल्याची चर्चा सुरू होती.
हम सब एक है
महाआरती संपन्न झाल्यावर सर्वांनी मंदिरात जावून दर्शन घेतले. यावेळी साताऱयातील सलोखा कायम ठेवणार असे सांगत हम सब एक है, असे एकमेकांच्या हातात हात घालून हात उंचावत नारा दिला. हे पाहून अनेकांनी टाळ्या वाजवल्या.
प्रशासनाने टाकला सुटकेचा निश्वास
भोंग्यामुळे वातावरण ताणाव पूर्ण होईल असा अंदाज प्रशासनाने बांधला होता. यामुळे शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यावर भर देण्यात आला. परंतु महाआरतीतून एकोप्याचे तसेच शांततेचा संदेश देत सामाजात तेढ निर्माण होऊ दिला नाही. हे पाहून प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला.
पर्यटकांनी घातले तेंडात बोट
सणामुळे मंगळवारी सुट्टी मिळाली. यामुळे अनेकांनी कास ठोसेघर येथे हजेरी लावली. यावेळी साताऱयात होणाऱया या महाआरतीला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली. एकोप्याची ही महाआरती पाहून अनेक पर्यटकांनी तोंडात बोट घातले.
महिलांचा मोठा प्रतिसाद
साताऱयात कोणत्याही कार्यक्रमात पुरूषा इतकांच महिलाही सहभाग घेतात. या महाआरतीत महिलांनीही आपला सहभाग नोंदवून इतिहासाला साक्ष दिली. महिलांचा मोठा प्रतिसाद पाहून अनेकजण भारावले. आम्हीही सलोखा कायम ठेवू असा संदेश महिलांनी दिला.









