नवी दिल्ली / वृत्तसंस्था
फ्रान्सची कंपनी नाव्हल ग्रुपने भारताच्या पाणबुडी प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱयापूर्वी एक दिवस कंपनीने हा निर्णय घोषित केला आहे. भारताच्या अटी पाळता येण्यासारख्या नसल्याने आम्ही बाहेर पडत आहोत, असे कारण कंपनीने दिले आहे.
भारताचा हा प्रकल्प पी-751 असा संबोधण्यात येतो. त्याअंतर्गत 6 पारंपरिक पद्धतीच्या पाणबुडय़ा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यासाठी 43 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी 5 आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी बोली लावल्या आहेत. त्यांच्यात या प्रेंच कंपनीचाही समावेश होता. तथापि, आता या कंपनीने बोली प्रक्रियेतून माघार घेतल्याने स्पधेंत चार कंपन्या उरल्या आहेत.
ज्या विदेशी कंपनीला हे कंत्राट मिळेल तिने दोन भारतीय कंपन्यांना धोरणात्मक भागीदार (स्ट्रटेजिक पार्टनर्स) म्हणून सामावून घेतले पाहिजे अशी अट आहे. ही अट प्रेंच कंपनीला अडचणीची वाटत होती असे बोलले जाते.









