भविष्यातील घरांसाठी ठरणार आदर्श पद्धत
डेन्मार्क हा युरोपीय देश अत्यंत सुंदर आहे. तेथील जुन्या परंपरा आणि आधुनिकतेचा संगम अवर्णनीय आहे. या देशात पाहण्याजोगे आणि शिकण्याजोगे बरेच काही आहे. या देशातील 300 वर्षे जुनी घरे अत्यंत विशेष आहेत. या घरांना त्यांच्या वैशिष्टय़ांमुळे फ्यूचर हाउसही म्हटले जाते. डेन्मार्कच्या या घरांचे महत्त्व आता खूपच वाढले आहे.
डेन्मार्कच्या लइसो बेटावर ही घरे दिसून येतात. या घरांचे छत अत्यंत जाड आकाराचे असते. हे छत सागरी शेवाळापासून तयार केले जाते, हे छत अत्यंत टिकाऊ असण्यासह तापमानही नियंत्रित करते. भविष्यात अनेक घरे याचप्रकारे तयार केली जाऊ शकतात असे मानले जात आहे.

17 व्या शतकातील घरे
17 व्या शतकात या बेटावर ही अनोखी सुरुवात झाली होती. तेथे समुद्रातून मीठ तयार करण्याचा उद्योग बहला होता. तेव्हा उद्योगधंद्यांसाठी वेगाने वृक्षतोड करण्यात आली. अशा स्थितीत घरांच्या निर्मितीसाठी लाकडाचा पुरवठा करणे अवघड ठरू लागल्यावर ही पद्धत शोधून काढण्यात आली.
सागरी शेवाळाचा वापर
बेट असल्याने अनेकदा जहाज समुद्रात दुर्घटनाग्रस्त होऊन तुटून बेटाच्या किनाऱयावर यायचे. अशा स्थितीत लोक लाकूड जमा करून त्याद्वारे घर तयार करता येऊ लागले आणि छतांसाठी सागरी शेवाळाचा वापर केला जाऊ लागला. 1920 च्या आसपास समुद्री शेवाळात एका फंगल इंफेक्शनमुळे लोकांनी याचा वापर थांबविला होता. यामुळे 1800 लोकसंख्या असलेल्या या बेटावर आता सागरी शेवाळांनी तयार केलेली केवळ 36 घरे शिल्लक राहिली आहेत.
घरांचे तंत्रज्ञान
बेटावर 2012 मध्ये पुन्हा घरनिर्मितीचे हे तंत्रज्ञान जिवंत करण्यात आले. बेटावरील रहिवासी स्वतःच या तंत्रज्ञानाला पुन्हा वापरात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेही या आविष्कारासाठी बेटावरील महिलांना श्रेय दिले जाते. 17 व्या शतकात पुरुष खलाशी म्हणून समुद्रात गेल्यावर एकाचवेळी 40 ते 50 महिला मिळून छत निर्मितीचे काम करत होत्या. सागरी वादळानंतर किनाऱयावर आलेले शेवाळ जमा केले जायचे. ते सुमारे 6 महिन्यांसाठी सुकविण्यात येत होते. एक छत 35 ते 40 टन वजनी असायचे.
विशेष प्रकारचे सागरी शेवाळ
सागरी शेवाळाचा एक विशेष प्रकार यात वापरला जातो, ज्याला ईलग्रास म्हटले जाते. ही शेवाळ आग पकडत नाही तसेच यात कुठल्याही प्रकारची कीड लागण्याची भीती नसते. हे शेवाळ कार्बन डायऑक्साइड शोषून घेते. हे शेवाळ वॉटरप्रूफ असते. 100 किंवा त्याहून अधिक वर्षांपर्यंत याचे छत टिकते.









