रशियाविरोधात लढणाऱया युक्रेनला मोठी भेट: बॉम्ब-लाँचरसह दिल्या विजयाच्या शुभेच्छा
रशिया-युक्रेन यांच्यात मागील दोन महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. युद्ध लांबत चालल्याने युरोपीय देश स्वतःच्या मार्गाने युक्रेनला मदत करत आहेत. स्पेनच्या महाराणी लेटिजिया यांनी ग्रेनेड आणि लाँचर यासारख्या शस्त्रास्त्रांसोबत स्वतःच्या हाताने लिहिलेले एक पोस्टकार्ड युक्रेनियन सैनिकांना पाठविले आहे. याचबरोबर स्पेनच्या महाराणींनी युक्रेनियन सैनिकांना पारंपरिक सॉसेजही पाठविले आहे.
महाराणींनी स्वतःचा शुभेच्छा संदेश आणि सॉसेजला ग्रेनेडच्या बॉक्समध्ये ठेवून युक्रेनियन सैनिकांना पोहोचविले आहे. स्पेन युक्रेनला ग्रेनेड आणि अन्य शस्त्रास्त्रs पुरवित आहे. महाराणी लेटिजिया यांनी याच शस्त्रास्त्रांच्या खेपसह पत्र आणि सॉसेज पाठविले होते. प्रारंभी एका युक्रेनियन सैनिकाला ग्रेनेडच्या डब्यात महाराणींचे पत्र मिळाले तेव्हा त्याला विश्वासच बसला नाही. परंतु नंतर त्यांवरील राजघराण्याची मोहोर आणि महाराणींची स्वाक्षरी पाहिल्यावर त्याचा विश्वास बसला.
तुमचा विजय इच्छिते..
स्वतःच्या छोटय़ा संदेशात महाराणींनी युक्रेनियन सैनिकांना उद्देशून ‘मी तुमचा विजय इच्छिते’ असे लिहिले आहे. 49 वर्षीय महाराणी लेटिजिया या स्पेनचे महाराज फिलिप सहावे यांच्या पत्नी आहेत. स्पेनमध्ये महाराणी लेटिजिया अत्यंत लोकप्रिय आहेत. देशातील सामाजिक कार्यांमध्ये त्या भाग घेत असतात.
युक्रेनला समर्थन
महाराणी लेटिजिया यांनी यापूर्वी देखील युक्रेनला समर्थन केले होते. युक्रेनवर रशियाच्या हल्ल्याच्या काही दिवसांनी लेटिजिया यांनी युक्रेनमध्ये परिधान करण्यात येणारा पारंपरिक गाउन घलून युक्रेनियन नागरिकांबद्दल समर्थन दर्शविले होते.









