पुणे / प्रतिनिधी :
तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयाची विद्यार्थिनी हर्षदा शरद गरुड हिने इतिहास रचत जागतिक विजेतेपदाला गवसणी घातली आहे. हर्षदाने महिलांच्या 45 किलो वजनी गटात ज्युनियर वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एकूण 153 लिफ्टसह सुवर्णपदक जिंकले. ग्रीसमधील हेरक्लिओन येथे आयोजित ज्युनियर जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय ठरली आहे.
एकूण 153 लिफ्टसह वेटलिफ्टर हर्षदा शरद गरुड हिने सोमवारी इतिहास रचला. महिलांच्या 45 किलो वजनी गटात स्पर्धा करताना 16 वर्षांच्या हर्षदाने स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी आठ स्पर्धकांच्या मैदानात एकूण 153 किलो (क्लीन अँड जर्क 83 किलो + स्नॅच 70 किलो) वजन उचलून विजेतेपद पटकावले. स्नॅचमधील 70 किलो प्रयत्नाने हर्षदाला पोडियममध्ये टॉप-ऑफ-द-पॉडियम फिनिश मिळवून दिले, तर क्लीन अँड जर्क विभागात ती दुसऱ्या क्रमांकावर होती.
इंद्रायणी महाविद्यालयात प्रथम वर्ष कला शाखेत शिकणारी हर्षदा गेल्या तीन महिन्यापासून पतियाळा येथील भारतीय सराव शिबिरात प्रशिक्षण घेत होती. त्याचवेळी तिची हेरक्लिओन ग्रीस येथील ज्युनिअर जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी निवड झाली. ही निवड सार्थ ठरवत तिने ज्युनिअर जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. हर्षदाचे वडील ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विभागात नोकरीस आहेत, तर आई गृहिणी आहे. लहान भाऊ शाळेत शिकत आहे. हर्षदा ही बिहारीलाल दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षण घेत आहे.









