9 जण पोलिसांच्या ताब्यात : या पूर्वी गांधी मार्केटात झाली होती कारवाई
प्रतिनिधी /मडगाव
मडगाव रेल्वे उड्डाण पुलाखाली एका दुकानात चालू असलेल्या मिनी कॅसिनोवर (ऑन लाईन गेम्स) मडगाव पोलिसांनी काल सोमवारी छापा मारून 9 जणांना अटक केली. भर बाजारात हा कॅसिनोचा जुगार चालू होता व त्याला कोणतीच परवानगी नव्हती. पोलिसांना या कॅसिनो संदर्भातील माहिती मिळताच पोलिसांनी धडक कारवाई करताना सुमारे 2.29 लाखांचा माल जप्त केला आहे.
पोलिसांनी या पूर्वी मडगावच्या गांधी मार्केटात कारवाई करताना अशाच प्रकारे कॅसिनोचा अड्डा उध्वस्त केला होता. काल सोमवारी पोलिसांनी उड्डाण पुलाजवळ असलेल्या गोवा गेस्ट हाऊसच्या खाली असलेल्या एका एसी दुकानात चालू असलेल्या या कॅसिनोवर कारवाई केली. या ठिकाणी कॅसिनो चालू असल्याचा कोणताच थागपत्ता लागत नव्हता. सायंकाळी माडगावचे पोलिस निरीक्षक सचिन नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली मडगाव पोलिसांनी ही कारवाई केली.
यावेळी या अड्डय़ावर सातजण जुगार खेळण्यासाठी आले होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याबरोबरच हा केसिनो चालवणाऱया दोन ऑपरेटरांनाही अटक केली आहे. पोलिसांनी या अड्डय़ातून 10 संगणक आणि रोख असा सुमारे 2.29 लाखांचा माल जप्त केल्याची माहिती निरीक्षक सचिन नार्वेकर यांनी दिली. या कॅसिनोच्या मूख्यसूत्रधाराला पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
समुद्रात व हॉटेलात सुरू असलेल्या कॅसिनोसाठी परवानगी घेतली जाते. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात शुल्क भरावे लागते. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत महसूल जमा होत असतो. मात्र, अशा प्रकारच्या मिनी कॅसिनोसाठी कोणतीच परवानगी घेतली जात नाही. बेकायदेशीरपणे हा कॅसिनो चालू करून लाखो रूपये कमावले जात असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात आढळून आली आहे.









