इस्लामाबाद / वृत्तसंस्था
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रानखान यांची यंदाची ईद कारागृहात होण्याची शक्यता आहे. या देशाचे नवे पंतप्रधान शहाबाझ शरीफ यांनी त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची पूर्ण तयारी केली असून, त्यांना त्वरित अटक होण्याची शक्यता आहे. शहाबाझ शरीफ यांच्या विरोधात अवमानजनक घोषणा देऊन त्यांना घेरण्याचा प्रयत्न काही इम्रान समर्थकांनी सौदी अरेबियातील मदीना येथील मोहम्मद पैगंबर यांच्या मशिदीनजीक केला होता. या कटाचे सूत्रधार इम्रान खान आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री आहेत, असा आरोप पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या पोलिसांनी ठेवला आहे. याच प्रकरणी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. 150 जणांवर हा आरोप ठेवण्यात आलेला आहे.
पंतप्रधान झाल्यानंतर शरीफ सौदी अरेबियात मदीना येथील मशिदीत गेले होते. त्यांच्यासह त्यांचे काही सहकारी आणि कुटुंबिय होते. ते मशीदीनजीक कारमधून उतरताच त्यांच्या 100-125 जणांनी घेरले आणि त्यांना उद्देशून अपशब्द उच्चारले आणि निषेधाच्या घोषणा दिल्या. शरीफ यांनी यासंबंधी पाकिस्तानात परतल्यानंतर तक्रार नोंदविली. प्राथमिक चौकशीत हे कारस्थान इम्रान खान आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील त्यांचे काही सहकारी यांनी केल्याचे स्पष्ट झाले असे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे प्रकरण त्यांना भोवणार अशी चिन्हे आहेत.
माजी मंत्री फवाद चौधरी आणि शेख रशीद, इम्रान यांचे माजी सल्लागार शहाबाझ गुल, पाक लोकप्रतिनिधीगृहाचे माजी उपाध्यक्ष कासीम सुरी आणि इम्रान यांचे लंडन येथील सहकारी अनिल मुसरत आणि साहिबजादा जहांगिर आदी व्यक्तींवर कट कारस्थान केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.









