वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मे महिन्याच्या प्रारंभी म्हणजेच 1 मे रोजी 19 किलो वजनाचा कमर्शियल एलपीजी सिलिंडर 102 रुपयांनी महागला आहे. राजधानी दिल्लीत आता कमर्शियल सिलिंडरची नवी किंमत 2,355 रुपये असणार आहे. परंतु घरगुती वापराच्या सिलिंडरच्या दरात मात्र कुठलीच वाढ करण्यात आलेली नाही. यापूर्वी कमर्शियल सिलिंडरची किंमत 1 एप्रिल रोजी 250 रुपयांनी वाढविण्यात आली होती.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशननुसार 19 किलो वजनाचा एलपीजी सिलिंडर आता राजधानी दिल्लीमध्ये 2,355.50 रुपयांमध्ये खरेदी करावा लागणार आहे. 30 एप्रिलपर्यंत याची किंमत 2,253 रुपये इतकी होती. तर कोलकात्यात पूर्वी हा सिलिंडर 2,351 रुपयांमध्ये मिळत होता, आता त्याची किंमत तेथे 2,455 रुपये झाली आहे. मुंबईत 2,205 रुपयांच्या जागी आता 2,307 रुपये कमर्शियल सिलिंडरसाठी खर्च करावे लागणार आहेत. तामिळनाडूत आता याकरता 2,508 रुपये मोजावे लागणार आहेत.
जेट इंधनही महाग
1 मेपासून जेट इंधनाच्या किमतीतही वाढ झाली आहे. दिल्लीत एअर टर्बाइन फ्यूलची किंमत 1,16,851.46 रुपये प्रतिलिटर झाली आहे. तर कोलकात्यात याची किंमत 1,21,430.48 रुपयांवर पोहोचली आहे. मुंबईत जेट इंधन 1,15,617.27 रुपये आणि चेन्नईत 1,20,728 रुपये प्रतिलिटर दराने मिळणार आहे. परंतु 1 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मात्र कुठलेच बदल करण्यात आलेले नाहीत.









