महाराष्ट्र दिनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण
सांगली/प्रतिनिधी
कोरोना महामारी, नैसर्गीक आपत्ती सारखे संकट झेलत महाराष्ट्र स्वाभिमानाने, कणखरपणे मार्ग काढत आहे. शासनाने गेल्या दोन अडीच वर्षात राज्याच्या विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. संकटाची मालिका सुरू असतानाही सर्व आघाड्यांवर लढण्यात, सर्वसामान्य माणसांना दिलासा देण्यात शासनाला यश आले आहे. हे सरकार ‘आपले सरकार’ असल्याची भावना निर्माण करण्यात राज्य शासन यशस्वी झाले आहे, असे सांगून जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगली जिल्हा हा कृषि प्रधान जिल्हा आहे, त्यामुळे जिल्ह्यातील कोणतेही गाव जलसिंचनापासून वंचित राहू नये यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला सर्वोतोपरी प्राधान्य दिले असून शिक्षण, आरोग्य, नागरी सुविधांच्या गुणवत्ता वाढीवर भर दिल्याचे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी प्रत्येकाने आपली सद्सदविवेक बुध्दी जागृत ठेवून सामाजिक एकोपा प्राणपणाने जपावा, असे कळकळीचे आवाहन केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६२ व्या वर्धापन दिनी मुख्य शासकीय समारंभात पोलिस परेड ग्राऊंड सांगली येथे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी महापौर दिग्वीजय सुर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षीत गेडाम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, आदि मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्राने समाज जीवनाच्या सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. कृषि, उद्योग, व्यापार, सहकार, शिक्षण, संशोधन, साहित्य, नाटक, चित्रपट, कला, संस्कृती अशा सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. देशातील प्रगतशील आणि पुरोगामी राज्य म्हणून आज महाराष्ट्राचा लौकिक आहे. गेल्या दोन अडीच वर्षाच्या काळात कृषि, उद्योग, वने, आरोग्य, जलसंपदा आदि विभागांतर्गत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला आहे.
गोरगरीब सर्वसामान्यांच्या मुलांना सरकारी शाळांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी या क्षेत्रात जिल्ह्यात आपण अमुलाग्र बदल घडवत आहोत. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमधून मॉडेल स्कूल अभियान राबविण्यात येत आहे असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, माझी शाळा आदर्श शाळा हा महत्वाकांक्षी व नाविण्यपूर्ण उपक्रम जिल्ह्यातील 176 शाळांमधून यशस्वीपणे राबविला आहे. सन 2022-23 मध्येही 156 जिल्हा परिषद शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 11 जिल्हा परिषद शाळांमध्ये सायन्स पार्क निर्मिती करण्यासाठी भरीव निधी आपण दिला आहे. अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा यामुळे जिल्हा परिषदेंच्या शाळांचा कायापालट होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढली आहे. महाराष्ट्र लोकसेवा अधिनियमांतर्गत 35 सेवा विद्यार्थ्यांसाठी तर 70 सेवा शिक्षकांसाठी 1 मे 2022 पासून सुरू होत आहेत.
पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, प्रतिवर्षी बसणाऱ्या महापूराचा तडाखा लक्षात घेता आपत्ती निवारण यंत्रणा बळकट करण्यावर भर दिला आहे. त्यामुळेच 2021 चा महापूर आला तरी महाप्रलय टाळण्यात आपल्याला यश आले आहे. पाटबंधारे विभागामार्फत पूरसंरक्षक भिंत बांधकाम, पूररेषा निश्चितीकरणाची कामे, विशेष दुरूस्तीची कामे करण्यात येत आहेत. कोणतेही गाव जलसिंचनापासून वंचित राहू नये यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत आहोत. खानापूर, आटपाडी, तासगाव, जत येथे टेंभूचे क्षेत्र वाढविण्याला आपण प्राधान्य दिले आहे.
सन 2021-22 मध्ये सांगली जिल्ह्यातील मोठे प्रकल्प, मध्यम प्रकल्प, लघु प्रकल्प, उपसा सिंचन योजना व कृष्णा नदीवरील क्षेत्र असे एकूण 2 लाख 64 हजार हेक्टर सिंचित क्षेत्र आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ या योजनांमधून एकूण 33 हजार हेक्टर क्षेत्र उपसा सिंचन योजनांद्वारे भिजविण्यात येत असून सद्य:स्थितीत आवर्तने चालू आहेत. या तीन उपसा सिंचन योजनांचा संकल्पीत वार्षिक पाणी वापर सुमारे 48 टीएमसी असून सद्य:स्थितीत वार्षिक 30 ते 35 टीएमसी पाणी अनेक टप्प्यांद्वारे उचलून अवर्षण भागातील शेतीसाठी सिंचन सुविधा पुरविण्यात येते. तसेच प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील लहान/मोठे तलाव पाण्याने भरुन दिले जात आहेत. त्यामुळे या भागांतील नागरिकांना व पशुधनास टंचाई कालावधीत टंचाई निवारणार्थ फार मोठी मदत झाल्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.