जिल्हा परिषद स्थापनेचा हिरक महोत्सव उत्साहात साजरा
सातारा/प्रतिनिधी
सातारा जिल्हा परिषद देशातील आदर्श जिल्हा परिषद आहे. विविध योजना राबविण्यात जिल्हा परिषद नेहमीच देशासह राज्यात अग्रेसर राहिली असून जिल्हा परिषदेचा देशात नावलौकीक आहे. हा नावलौकीक कायम ठेवण्यासाठी यापुढेही सर्वांनी एकत्र काम करावे, असे प्रतिपादन सहकार, पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
जिल्हा परिषद स्थापना हिरक महोत्सवानिमित्त जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाटील बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, माजी शिक्षण अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने जिल्हा परिषदेची स्थापना करण्यात आली. सातारा जिल्हा परिषदेचा ग्रामीण विकासात मोठा वाटा आहे. ग्रामीण भागातील आरोग्य, रस्ते, पिण्याचे पाणी यासह विविध कामे केली जात आहेत. प्रामाणिक अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या गुणवत्तापूर्ण कामांमुळे सातारा जिल्हा परिषदेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. आज सातारा जिल्हा परिषदेचा नावलौकीक देशासह राज्यात आहे. हा नावलौकीक कायम टिकवून ठेवा, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले.
ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचवावे म्हणून जिल्हा परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या स्व निधीमधून रस्ते, आरोग्य, शिक्षण यासह अनेक विकास कामे करण्यात येत आहे. सातारा जिल्हा परिषदेकडे एक आदर्श जिल्हा परिषद म्हणून पाहिले जात आहे. यापुढेही चांगले काम करुन सातारा जिल्हा परिषदेचा नावलौकीक आणखीन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रास्ताविकात गौडा यांनी सांगितले. या कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.