शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न.. हीच शाहू महाराजांना आदरांजली
कोल्हापूर/ प्रतिनिधी
राजर्षी शाहू महाराजांनी सक्तीच्या मोफत शिक्षणाचा कायदा संस्थानात केला. शाहू महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेऊन कोल्हापूर जिल्ह्यातील एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी विविध उपक्रम हाती घ्यावेत, असे सांगून शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करा, शाळांची पटसंख्या वाढवा, असे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ‘हिरक महोत्सव समारंभ’ पार पडला , यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, विविध मान्यवर जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचे स्मरण करुन जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभागाने वेगवेगळे उपक्रम हाती घ्यावेत. काही शाळांची पटसंख्या अत्यंत कमी आहे. कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांमध्ये सर्व विषय शिकवणारे शिक्षक मिळण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी जवळच्या अंतरावरील 5 किंवा 10 गावांचा गट तयार करून कमी शिक्षक असणाऱ्या शाळेमध्ये जादाचे शिक्षक उपलब्ध करुन द्यावेत. जेणेकरुन विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देता येईल. मेन राजाराम हायस्कूल ची पटसंख्या वाढण्याच्या दृष्टीने याठिकाणी सेमी इंग्रजी माध्यमातील शिक्षण सुरु करावे, असे सांगून पालकमंत्री श्री पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्हा शंभर टक्के कुपोषणमुक्त करण्यासाठीही प्रयत्न होणे आवश्यक आहेत. जिल्ह्यातील मुला-मुलींच्या जन्मदराकडे लक्ष देणे आवश्यक असून मुलींचा जन्मदर वाढणे आवश्यक आहे.
राजर्षी शाहू महाराजांचे विचार व त्यांच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 6 मे 2022 रोजी सकाळी 10 वाजता 100 सेकंद आहे त्या ठिकाणी स्तब्ध उभे राहून लोकराजा शाहू महाराजांना आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन करुन ते म्हणाले, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे काम कौतुकास्पद असून विविध योजनांमध्ये उल्लेखनीय काम होत आहे. कोल्हापूर जिल्हा कोविड मुक्त होण्यामध्ये आरोग्य विभागाचा वाटा महत्त्वाचा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील नागरिकांना सर्व सेवा देण्यासाठी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडत आहेत. दरडोई उत्पन्नात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर आहे. यापुढेही जिल्ह्याची प्रगतीच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी रेखावार यांनी केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण म्हणाले, महाराष्ट्र राज्यामध्ये 1 मे 1962 रोजी त्रिस्तरीय कार्यपध्दती अस्तित्वात येवून जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची स्थापना करण्यात आली. राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या स्थापनेस 1 मे 2022 रोजी 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने जिल्हा परिषदेअंतर्गत ‘हिरक महोत्सव समारंभ’ घेण्यात येत आहे. महात्मा गांधीजींनी ‘खेड्याकडे चला’ हा संदेश दिला. गावांमध्ये प्रत्येक घराबाहेर शोष खड्डा ठेवणे, घनकचरा व्यवस्थापन, पाण्याचा काटकसरीने वापर तसेच स्वच्छतेचा संकल्प यानिमित्ताने सर्वांनी करावा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा परिषद यापुढेही लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्याशी समन्वय ठेवून उत्कृष्ट काम करत राहिल, अशी ग्वाही श्री चव्हाण यांनी यावेळी दिली.