अखेर मुंबई इंडियन्सने खाते उघडले! हंगामातील पहिलाच विजय! राजस्थानविरुद्ध 5 गडी राखून यश
मुंबई / वृत्तसंस्था
अनुभवी सूर्यकुमार यादव (51) व युवा तिलक वर्मा (35) यांच्या दमदार फलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने 35 वा वाढदिवस साजरा करत असलेल्या कर्णधार रोहित शर्माला शनिवारी या हंगामातील पहिल्यावहिल्या विजयाचे अनोखे गिफ्ट दिले. मुंबईसाठी हा 9 सामन्यातील पहिलाच विजय ठरला. रोहितसेनेने तगडय़ा राजस्थान रॉयल्सला 5 गडी राखून नमवत गुणतालिकेत खाते उघडले.
विजयासाठी 159 धावांचे आव्हान मुंबईने 19.2 षटकात पार केले. सूर्यकुमार यादव व तिलक वर्मा यांनी तिसऱया गडय़ासाठी 81 धावांची भागीदारी साकारली आणि यामुळे मुंबईला विजयाच्या दिशेने मार्गोत्क्रमण करता आले. 9 चेंडूत नाबाद 20 धावा जमवणाऱया टीम डेव्हिडने फिनिशिंग टचवर भर दिला तर सॅम्सने आपल्या पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार खेचत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब करुन दिले. सलग 8 पराभवानंतर पहिलावहिला विजय मिळवल्यानंतर कर्णधार रोहित शर्माला सुद्धा मोठा दिलासा लाभला.
मुंबईने विजयाचे खाते उघडले असले तरी या लढतीत रोहित शर्माचा (2) खराब फॉर्म मात्र कायम राहिला. रोहितने येथे अश्विनला (1-21) स्लॉग स्वीप करण्याच्या प्रयत्नात स्क्वेअर लेगवरील डॅरेल मिशेलकडे सोपा झेल दिला. 15.25 कोटी रुपयांची बोली इशान किशन या लढतीतही सार्थ ठरवू शकला नाही. त्याला 18 चेंडूत 26 धावा जमवल्यानंतर पूलचा फटका चुकल्यानंतर तंबूत परतावे लागले.
तत्पूर्वी, जोस बटलरने 52 चेंडूत 67 धावांची आतषबाजी केल्यानंतरही राजस्थानला 20 षटकात 6 बाद 158 अशा माफक धावसंख्येवर समाधान मानावे लागले. बटलरची सरासरी 70 च्या घरात असून त्याचा स्ट्राईक रेटही 155 पेक्षा अधिक राहिला आहे. ऑस्ट्रेलियन पेसर रिले मेरेडिथने 24 धावात 2 बळी घेतले तर युवा फिरकीपटू कुमार कार्तिकेय (1-19) आपल्या पहिल्या लढतीत प्रभावी ठरला.
संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स ः 20 षटकात 6 बाद 158 (जोस बटलर 52 चेंडूत 5 चौकार, 4 षटकारांसह 67, रविचंद्रन अश्विन 9 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह 21, डॅरेल मिशेल 17, संजू सॅमसन 16, देवदत्त पडिक्कल 15. अवांतर 12. ऋतिक शोकिन 2-47, रिले मेरेडिथ 2-24, सॅम्स, कुमार कार्तिकेय प्रत्येकी 1 बळी).
मुंबई इंडियन्स ः 19.2 षटकात 5 बाद 161 (सूर्यकुमार यादव 39 चेंडूत 5 चौकार, 2 षटकारांसह 51, तिलक वर्मा 30 चेंडूत 35, टीम डेव्हिड 9 चेंडूत नाबाद 20, पोलार्ड 10, सॅम्स 1 चेंडूत नाबाद 6. अवांतर 11. बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, अश्विन, चहल, कुलदीप सेन प्रत्येकी 1 बळी).









