राज्य-केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणा : जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे निर्माण झालेल्या महागाईच्या विरोधात युवा काँग्रेसने शुक्रवारी निदर्शने केली. कर्नाटकातील भाजप सरकारच्या 40 टक्के कमिशनच्या आशेला बेळगाव येथील कंत्राटदार बळी पडला. आणखी किती जणांचा बळी जाणार? असा प्रश्न युवा काँग्रेसचे राज्याध्यक्ष महम्मद नलपाड यांनी उपस्थित केला.
महागाई विरोधात बेळगाव जिल्हा ग्रामीण व बेळगाव शहर, चिकोडी जिल्हा युवा काँग्रेसच्यावतीने आंदोलन हाती घेण्यात आले होते. काँग्रेसच्या राजवटीत गॅस सिलिंडरचा दर एक रुपयाने जरी वाढला तरी हेच भाजप नेते सिलिंडर घेऊन आंदोलन करीत होते. आता ते कोठे आहेत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी युवा नेते राहुल जारकीहोळी, जिल्हा ग्रामीण युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष मृणाल हेब्बाळकर, जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी, जिल्हा सरचिटणीस प्रदीप एम. जे., अरुण कटांबले, सिधू सुणगार, परशराम ढगे, कार्तिक पाटील, विनय पाटील, हणमंत शेखण्णावर, मलगौडा पाटील, युवराज कदम आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. धर्मवीर संभाजी चौक परिसरातून निषेध मोर्चाला सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येऊन जिल्हाधिकाऱयांमार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले. मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी राज्य व केंद्र सरकारविरोधात घोषणा दिल्या. महागाई, भ्रष्टाचार, 40 टक्के कमिशन आदींमुळे सर्वसामान्यांचे जगणे असहय्य झाले आहे, असे मोर्चेकऱयांनी सांगितले.