राजापूर
मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात उंच पूल असलेल्या राजापूर शहरातील वरची पेठ पुलाचे काम पूर्ण झाले आहे. गुरुवारपासून या पुलावरून तात्पुरत्या स्वरूपात एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पूल वाहतुकीसाठी खुला केल्यानंतर अनेकांनी पहिल्यांदा पुलावरून वाहन नेण्याचा आनंद घेतला तर पुलावर सेल्फी घेण्यासाठीही गर्दी केली होती.
बहुचर्चित मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या राजापूर तालुक्यातून जाणाऱया सुमारे 34 किलोमीटर रस्त्याचे काम केसीसी बिल्डकॉन कंपनीकडून हाती घेण्यात आले आहे. हातिवलेपासून तळगावपर्यंत बहुतांश काम पूर्ण झाले आहे. अर्जुना नदीवर वरचीपेठ येथे महामार्गावर पूल उभारण्यात आला आहे. मुंबई ते गोवा या सुमारे 450 किलोमीटरच्या महामार्गावर छोटे-मोठे 70 ते 75 पूल आहेत. यात सर्वाधिक उंच पूल म्हणून राजापूरच्या पुलाची ओळख निर्माण झाली आहे.
सध्याच्या ब्रिटिशकालीन पुलापासून अर्जुना नदीपात्रात शिळकडे जाताना 100 ते 125 मीटरवर हा नवीन पूल बांधण्यात आला आहे. सुमारे 36 मीटर उंच, 300 मीटर लांब आणि 30 मीटर रूंद असा हा दुहेरी पूल आहे. या पुलाला 14 खांब असून नदीपात्रातून सुमारे 36 मीटर उंचीचे चार खांब आहेत. या पुलाची नदीपात्रातील लांबी 220 मीटर तर जमिनीवरील लांबी सुमारे 80 मीटर आहे.
या पुलामुळे छोटी-मोठी 11 वेडीवाकडी आणि धोकादायक वळणे कमी झाली आहेत. त्यामुळे या पुलावरून वेगवान आणि सुरक्षित प्रवास करता येणार आहे. अत्याधुनिक भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करून हा पूल बांधण्यात आला आहे. या पुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अद्याप निश्चित नसला तरी गुरुवारपासून या पुलावरून एकेरी वाहतूक सुरू झाली आहे.









