वृत्तसंस्था/ मलप्पुरम
केरळमध्ये सुरू असलेल्या सातव्या संतोष करंडक राष्ट्रीय पुरुषांच्या फुटबॉल स्पर्धेतील गुरुवारी येथे झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात केरळने कर्नाटकाचा 7-3 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव करत अंतिम फेरी गाठली. केरळने आतापर्यंत ही प्रति÷sची स्पर्धा सहावेळा जिंकली आहे. केरळ संघातील टी. के. जेसीनने 5 गोल नोंदविले.
या सामन्यात केरळने पहिल्या मिनिटापासूनच आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर देत कर्नाटकाच्या बचावफळीवर चांगलेच दडपण आणले. दबावाखाली खेळणाऱया कर्नाटकाला गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या. पण केवळ दडपणाखाली त्यांनी त्या घालविल्या. या सामन्यात 25 व्या मिनिटाला एन. सोलाईमलाई याने कर्नाटकाचे खाते उघडले. 30 व्या मिनिटाला टी. के. जेसीनने केरळचे खाते उघडून कर्नाटकाशी बरोबरी साधली. 35 व्या मिनिटाला जेसीनने वैयक्तिक आणि संघाचा दुसरा गोल नोंदविला. 45 व्या मिनिटाला जेसीनने केरळचा तिसरा गोल केला. गिलबर्टच्या पासवर त्याने हेडरद्वारे हा गोल नोंदवून केरळची आघाडी वाढविली. या सामन्यात बदली खेळाडू टी. के. जेसीनने केवळ पंधरा मिनिटांच्या कालावधीत सामन्याचे चित्र पालटले. केरळचा चौथा गोल शिगहिलने केला. मध्यंतरापर्यंत केरळने कर्नाटकावर 4-1 अशी आघाडी मिळविली होती. कर्नाटकाचा दुसरा गोल उत्तरार्धातील खेळाच्या 5 व्या मिनिटाला कमलेशने केला. यानंतर केवळ दोन मिनिटांच्या कालावधीत केरळने 3 गोल नोंदविले. 72 व्या मिनिटाला कर्नाटकाचा तिसरा गोल नोंदविला गेला. आता या स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना पश्चिम बंगाल आणि मणिपूर यांच्यात खेळविला जाणार आहे.









