वृत्तसंस्था/ मुंबई
मुंबई संघाचा वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीचा आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी मुंबई इंडियन्स संघात समावेश करण्यात आला आहे. सदर माहिती या संघाच्या व्यवस्थापकाने दिली आहे.
2022 च्या आयपीएल हंगामात माजी विजेत्या मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी अत्यंत निकृष्ट झाली असून त्यांचे या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. मुंबई इंडियन्स संघाला सलग आठ सामन्यात पराभव स्वीकारावा लागला असल्याने गुणतक्त्यात ते शेवटच्या स्थानावर आहेत. या स्पर्धेतील उर्वरित सामन्यात विजयाचे खाते उघडण्यासाठी या संघाच्या प्रशिक्षकवर्गाने गोलंदाजी भक्कम करण्याकरिता 33 वषीय वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीचा संघात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या संघातील वेगवान गोलंदाज बुमराह निस्तेज ठरला आहे. त्याने आठ सामन्यात 229 धावांच्या मोबदल्यात केवळ 5 गडी बाद केले असल्याने मुंबईची गोलंदाजी कमकुवत असल्याचे जाणवते. या संघातील आणखी एक वेगवान गोलंदाज जयदेव उनादकटने 190 धावात 6 बळी मिळविले आहेत. तसेच डॅनियल सॅम्सने 209 धावात 6 गडी बाद केले आहेत. आयपीएल स्पर्धेचा धवल कुलकर्णीला यापूर्वी बऱयापैकी अनुभव असून तो यापूर्वी या स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करत होता. आयपीएल स्पर्धेत त्याने आतापर्यंत 92 सामन्यात 86 गडी बाद केले आहेत.









