राजाकडे तो बालक अगदी बरीच ओळख असल्यासारखा सहजपणे गेला, ह्याचे आश्चर्य त्या तापसीला वाटले. सर्वदमनला कुरवाळत राजा तापसीला त्याचे कुळ विचारतो. ती ते पुरुवंश असल्याचे सांगते. राजाचेही तेच कुळ असल्याने तो चकित होतो. त्याला वाटते म्हणूनच हा ह्या बाईला माझ्यासारखा दिसतोय. त्याला वाटते की, जे तारूण्यामध्ये सुखांनी परिपूर्ण अशा घरात पृथ्वीच्या रक्षणासाठी राहतात, पण पुढे राजा झाल्यानंतर त्याला तप करावे लागते, कधी झाडाखाली राहून घर मानावे लागते. पण मनुष्याला मानवी रूपात या ठिकाणी इंद्रपुरीत येणे मात्र अशक्मय आहे. असे म्हटल्यावर ती बाई सांगते की, ह्यांच्या आईचे अप्सरेशी नाते असल्याने ती ह्या देवपित्याच्या तपोवनात प्रसूत झाली. हे ऐकल्यावर राजाची उत्सुकता आणखी ताणली जाते. ती कोणत्या राजषीची पत्नी असे विचारतो. तेव्हा त्याने धर्मपत्नीचा त्याग केला आहे. पण त्यांचे नाव सांगू इच्छित नाही. ती सारी कथा त्याच्याशीच मिळतीजुळती होती. पण त्याच्या आईचे….परस्त्रीचे नाव कसे विचारावे? असा प्रश्न त्याला पडतो. तेवढय़ात एक तापसी मातीचा मोर घेऊन येते. ‘सर्वदमना, हे शकुंतलावण्य पहा’ असे म्हणते. तेव्हा बालक ‘कुठे आहे माझी आई?’ असे विचारतो. शब्दातील नामसाधर्म्यामुळे त्याला आपली आईच आल्यासारखे वाटते. पण मातीच्या मोराचे सौंदर्य पहा असे तिला म्हणायचे होते. पण त्या मुलाच्या आईचे नाव शकुंतला असल्याचे ऐकून राजा चमकतो! एकासारखी एक नावे असतात. तसेच हे असेल, असे त्याला वाटते.
बालकाला तो मातीचा मोर खूप आवडतो. पण सिंहाच्या छाव्याशी खेळताना त्यांच्या हातातला ताईत गळून पडलेला असतो. तो तापसी शोधत असते. राजाला तो सापडतो. त्या बायका त्याला तो उचलू नये म्हणून सांगत असतानाच राजा तो उचलतो. त्याचे कारण विचारले असता त्या सांगतात की, भगवान मारिचांनी ही अपराजिता नावाची वल्ली मुलाच्या जन्मसंस्काराच्या वेळी दिलेली असते. ती भुईवर पडली असता, आईबाप किंवा तो स्वतः यांच्याखेरीज दुसरा कोणीही ती उचलू शकत नाही. जर दुसऱया कोणी उचलली, तर सर्प होऊन त्याला डसते. तसे पूर्वी अनेकदा घडलेले असते. पण राजाने तो उचलल्यावर मात्र तसे काही घडत नाही. ते पाहिल्यावर राजाला अत्यानंद होतो. तो बालकाला आलिंगन देतो. तापसीला ते सारे पाहून खूप आश्चर्य आणि आनंद होतो.








