सात राज्यांमध्ये थंडाव्यासाठी नागरिकांची धडपड, दक्षता घेण्याचा सल्ला
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मागील बुधवार देशभरात उष्णतेचे थैमान घालून गेला आहे. पण याहीपेक्षा अधिक तगमग मेमध्ये होणार आहे. सर्वसाधारणपणे 15 मे च्या आसपास जे तापमान असते, ते यावेळी एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ातच गाठले गेले. त्यामुळे मेमध्ये काय होणार या नुसत्या विचारानेच अंगाची लाहीलाही झाल्यास नवल नाही. यंदाचा उन्हाळा अशाप्रकारे लक्षात राहण्यासारखा असेल, असा इशारा देण्यात आला असून आरोग्यासंबंधी दक्ष रहा, असे आवाहन तज्ञांनी केले आहे.
पर्जन्यमान विभागाच्या म्हणण्यानुसार सध्या देशभरात उष्म्याचा कहर सुरू आहे. त्यातही विशेषतः सात राज्यांमध्ये जीव कासावीस करणारी उष्मालाट असून ती आणखी 3 ते 5 दिवस आपला प्रभाव दाखविणार आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, झारखंड पश्चिम बंगाल आणि ओडिसा या सात राज्यांमध्ये दि. 1 ते 3 मेपर्यंत ही लाट राहील. तर बिहार, छत्तीसगड, चंदीगढ, दिल्ली आदी भागांमध्ये ती आणखी एक-दोन दिवस असेल. गुजरातमध्ये तिचा प्रभाव आता कमी झाला आहे. तरीही तापमान उच्चच राहणार आहे. लाट ओसरल्यानंतर ते 2 डिग्री कमी होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात सर्वत्र तापमान सध्या 43 ते 45.6 डिग्री सेल्शियस इतके असून दुपारी काम करणेही लोकांना अशक्य झाले आहे.
पावसाचीही शक्यता
देशाच्या पश्चिम भागात तसेच उत्तर भागात वाऱयांचा वेग येत्या काही दिवसांमध्ये वाढणार असून अनेक स्थानी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. साहजिकच यामुळे तापमान कमी होऊन लोकांना अतिआवश्यक असणारा थंडावा मिळू शकतो. तरीही त्यानंतर मेच्या मध्यापर्यंत तापमान आतापेक्षाही अधिक वाढून उष्मालाट येऊ शकते.
पाणी…पाणी…
उष्म्यापासून संरक्षणाचे एकमेव स्वस्त साधन म्हणजे पिण्याचे पाणी हे आहे. त्यामुळे पाणी आणि पाणी अधिक असणाऱया पदार्थांची मागणी वाढली आहे. याचकाळात पाणीटंचाईही अनेक भागांमध्ये असते. त्यामुळे अनेकदा दुहेरी संकटाशी दोन हात करावे लागतात. उत्तर भारतात काही भागात ही स्थिती आहे.
एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात देशात गेल्यावर्षीच्या एप्रिलपेक्षा जास्त उष्णतेचा अनुभव येत आहे.
तापमानात किमान 1 डिग्री सेल्शियसची वाढ झाली असल्याचे स्पष्ट केले गेले. गेल्या पन्नास वर्षांमध्ये एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात इतके तापमान क्वचितच अनुभवयास मिळाल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
दिल्लीत यलो अलर्ट
दिल्लीत गुरुवारपासून पुढचे काही दिवस यलो अलर्ट घोषित करण्यात आला. चार रंगांमध्ये हा इशारा देण्यात येतो. हरित सूचना असेल तर कोणतीही चिंता करण्याचे कारण नसते. पिवळा (यलो) इशारा असेल तर सावध रहावे लागते. केशरी इशारा असेल तर उपाययोजनेची सज्जता ठेवावी लागते तर तांबडा इशारा असल्यास त्वरित कारवाई करुन स्वतःचे संरक्षण करावे लागते.









