मनपाकडून खड्डे-चरी बुजविण्याची कार्यवाही
प्रतिनिधी / बेळगाव
शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. चित्ररथ मिरवणूक मार्गांवरील खड्डे बुजविण्याबरोबरच रस्त्यांशेजारील कचऱयाची उचल करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मिरवणुकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा अनर्थ घडू नये, याकरिता खबरदारी म्हणून रस्त्याशेजारील दगड जमा करण्याची मोहीम महापालिकेच्यावतीने गुरुवारी राबविण्यात आली.
शहरात शिवजयंती उत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. येथील शिवजयंती उत्सव चित्ररथ मिरवणूक जल्लोषात काढली जाते. शहरात हजारो नागरिक शिवजयंती मिरवणुकीत सहभागी होतात. मागील दोन वर्षात कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे शिवजयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. तसेच दोन वर्षात मिरवणूक काढण्यात आली नाही. त्यामुळे यंदा मोठय़ा उत्साहाने शिवजयंती चित्ररथ मिरवणूक काढण्याची तयारी शिवजयंती उत्सव मंडळे करीत आहेत. मात्र बाजारपेठेतील मिरवणूक मार्गांवर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. रस्त्यांवर चरी निर्माण झाल्याने चित्ररथ मिरवणुकीस अडथळा होण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर मिरवणूक मार्गांवरील खड्डे आणि चरी बुजविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली होती.
त्यामुळे महापालिकेच्यावतीने रस्त्यांची डागडुजी करण्यात येत आहे. रस्त्यांवरील चरी आणि खड्डे बुजविण्यात येत आहेत. चित्ररथ मिरवणूक पाहण्यासाठी हजारो नागरिक शहरात येत असतात. त्यामुळे मिरवणूक मार्गांशेजारी असलेले खड्डे बुजविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे कोणताही अनर्थ घडू नये, याकरिता रस्त्यांशेजारी असलेले लहान-मोठे दगड जमा करण्याची मोहीम महापालिकेच्यावतीने राबविण्यात आली. शिवजयंती उत्सव आणि चित्ररथ मिरवणूक शांततेत आणि शिस्तबद्धरितीने काढण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.









