गळतीद्वारे वाहणारे पाणी गटारीत : त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
शहर आणि उपनगरात जलवाहिन्यांना गळती लागून मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात आहे. एकीकडे पाणीटंचाईची समस्या भेडसावत असताना दुसरीकडे जलवाहिन्यांच्या दुरुस्तीकडे एलऍण्डटी कंपनीने कानाडोळा केला आहे. जुना धारवाड रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाखाली जलवाहिनीला गळती लागून गेल्या कित्येक महिन्यांपासून पाणी वाया जात आहे. पण याची दुरुस्ती करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात असून दुरुस्तीकडे कानाडोळा करण्यात आल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. जलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच विद्युतपुरवठा खंडित होत असल्याने शहरवासियांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा नियोजनाचा बोजवारा उडाल्याने पाणीसमस्या निर्माण झाली आहे.
जुना धारवाड रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाखाली तानाजी गल्ली कॉर्नर येथे जलवाहिनीला गळती लागली आहे. गळती लागून महिना उलटला तरी दुरुस्ती केली नाही. गळतीद्वारे वाहणारे पाणी गटारीमधून वाया जात आहे. गळती निवारणासाठी परिसरातील रहिवाशांनी एलऍण्डटीच्या अधिकाऱयांसह व्हॉल्वमनकडे तक्रार केली. पण याची दखल घेण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. पाणी सोडण्यासाठी व्हॉल्वमन या परिसरात नेहमी येतो. त्यामुळे नागरिकांनी जलवाहिनीच्या दुरुस्तीची सूचना केली असता दुरुस्तीचे काम करण्यात येईल, असे ते सांगत आहेत. पण प्रत्यक्षात कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे येथील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.









