भारत पेट्रोलियम-सोमनाथ पेट्रोलियम यांचे सौजन्य : शेतकऱयांना बहुमोल मार्गदर्शन
वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
भारत पेट्रोलियम लिमिटेड यांच्या विद्यमाने व सोमनाथ पेट्रोलियम कंग्राळी खुर्द यांच्या सौजन्याने पेट्रोलपंप आवारात नुकताच किसान मेळावा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कंग्राळी खुर्द ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील होते.
प्रमुख पाहुणे म्हणून प्रगतशील शेतकरी वामन पाटील, सी. एम. पाटील, निंगोजी पाटील, कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, बाबू दोडमनी, ओमकार सोसायटीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, सामाजिक कार्यकर्ते मल्लाप्पा पाटील, मयूर बसरीकट्टी, निवृत्त जवान मोनाप्पा बसरीकट्टी, कल्लाप्पा पाटील आदी उपस्थित होते.
शेतकऱयांना शेती पिकांबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी कंपनीचे अधिकारी अभय भिसाय यांची खास उपस्थिती होती.
प्रारंभी सोमनाथ पेट्रोलियमचे संचालक नागेश बसरीकट्टी यांनी किसान मेळावा भरविण्याचा उद्देश सांगून शेतकरी बांधवांचे स्वागत केले. शेतकरीवर्गाच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
यावेळी सोमनाथ पेट्रोलियमचे संचालक नागेश बसरीकट्टी, मोनाप्पा बसरीकट्टी, मयूर बसरीकट्टी यांच्या हस्ते उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
ड्रॉप किंवा स्प्रिंकलरने पाणी पाजणे सोयीचे
शेतकरीवर्गाला मार्गदर्शन करताना भारत पेट्रोलियमचे अधिकारी अभय भिसाय म्हणाले, सध्या ड्रॉप किंवा स्प्रिंकलरने पाणी सोडून पिके वाढविणे अधिक सोयीचे होत आहे. या पद्धतीमध्ये पीकसुद्धा भरघोस येते. बाजारपेठेमध्ये दर चांगला मिळाल्यास सदर पद्धत शेतकऱयाला अधिक फायदेशीर असल्याचे सांगून शेतकऱयाला तण, भांगलणीचा खर्च कमी लागून पीक लवकर बहरून येते. यामुळे शेतकरीवर्गाला चांगले उत्पादन मिळते, असे त्यांनी सांगितले.
पावसाळी भात रोप लागवड
पावसाळी भात रोप लागवड करताना सुधारित भात बियाणे वापरून अधिक उत्पादन घेता येते. कृषी खात्याने अनेक सुधारित भात बियाणे तयार केली आहेत. त्यांची योग्य पद्धतीने रोप लागवड करून अधिक उत्पादन घेण्याचे आवाहन उपस्थित शेतकऱयांना केले.
ड्रॉप व स्प्रिंकलर पाईप सवलतीत
शेतकरीवर्गाने आपल्याला ग्रा. पं. कार्यक्षेत्रातील ग्रामसेवकांशी संपर्क साधून ड्रॉप व स्प्रिंकलर पाईप सेट शासनाच्या सवलती दरात मिळवून घेण्याचेही यावेळी आवाहन करण्यात आले. मेळाव्यात कंग्राळी खुर्द, अलतगा, कंग्राळी बुद्रुकसह किर्यात गावांतील शेतकरी उपस्थित होते. प्रशांत पवार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.









