काश्मीरमध्ये ऑपरेशन ऑलआऊट : 4 महिन्यात 62 दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात मोठी कारवाई करत असताना सुरक्षा दलांनी चकमकीत अल-बद्रच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पुलवामा येथे बुधवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांशी चकमक सुरू झाली. या संघर्षात दोन दहशतवादी मारले गेले. या चकमकीत एक जवानही जखमी झाल्याचे सुरक्षा सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या वर्षात आतापर्यंत 62 दहशतवादी चकमकीत ठार झाले आहेत.
पुलवामाच्या मित्रीगाम भागात 2-3 दहशतवादी लपून बसल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने कारवाई सुरू केली. या कारवाईदरम्यान झालेल्या गोळीबारात एजाज हाफीज आणि शाहिद अय्युब असे दोन दहशतवादी ठार झाले. चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून 2 एके-47 रायफल्स आणि स्फोटकजन्य वस्तू हस्तगत केल्या आहेत.
चालू महिन्यातील चौथी मोठी चकमक
एप्रिल महिन्यात सुरक्षा दल आणि पोलीस यांच्यात संयुक्तपणे झालेली ही चौथी मोठी चकमक आहे. 4 एप्रिल रोजी अनंतनाग आणि कुलगाममध्ये एकाचवेळी ऑपरेशन करण्यात आले. या संघर्षात लष्कराचा प्रमुख कमांडर निसार डारसह आणखी एक दहशतवादी मारला गेला. 11 एप्रिल रोजी शोपियानमध्ये चकमकीत 2 दहशतवादी मारले गेले, तर 14 एप्रिल रोजी शोपियान जिह्यातील बुडिगाम भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी मारले गेले.
4 महिन्यात 62 दहशतवादी ठार दहशतवादाविरोधात पोलीस आणि सुरक्षा दलांची कारवाई सातत्याने सुरू आहे. गेल्या 4 महिन्यांत 62 दहशतवादी मारले गेले आहेत. यामध्ये लष्करचे 39, जैशचे 15, हिजबुलचे 6 आणि अल-बद्रच्या 2 दहशतवाद्यांचा समावेश आहे. ठार झालेल्या एकूण 62 दहशतवाद्यांपैकी 47 स्थानिक आणि 15 विदेशी दहशतवादी असल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांचे आयजीपी विजयकुमार यांनी सांगितले. यापूर्वी 2021 मध्ये चकमकीत 182 दहशतवादी मारले गेले होते.