ऑनलाईन टिम : पुणे
कोल्हापूरमधील घटना ताजी असताना पुण्यात देखील एसटी बसचा ब्रेक फेल होऊन भर चौकात सहा-सात वाहनांना चिरडले आहे. हि घटना धनकवडी येथील सद्गुरू श्री शंकर महाराज उड्डाणपूलवर घडली. ही घटना आज सकाळी बारा वाजता घडली. या अपघातामध्ये तीन जण गंभीर जखमी तर चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले असून सहा ते सात वाहनांना चिरडले असून त्याचे नुकसान झालं आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातानंतर पुलावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
सातारा – स्वारगेट बस (क्रमांक एमएच ०६ एस ८४६७) ही साताऱ्यातुन सकाळी पुण्याकडे रवाना झाली होती. दरम्यान गुरुवारी सकाळी बारा वाजता हि बस पुण्यातील धनकवडी येथील सदगुरु श्री शंकर महाराज उड्डाणपूलावर आली. पुलावरून जाताना अचानक एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने समोरच्या वाहनांना धडक देत बाजूच्या संरक्षक भिंतीला जाऊन धडकली. एसटी बसचे हँन्ड लाँक होऊन थांबल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. या एसटी बसने पुलावरून जाणाऱ्या एका चारचाकीसह, सहा ते सात दुचाकींना धडक दिली. त्यामुळे त्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उड्डाणपूलावरून जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. सहकारनगर वाहतूक शाखेच्या वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त एसटी क्रेनच्या साह्याने बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.