दरवाजा फोडून 4 लाखाचा ऐवज पळविला
प्रतिनिधी /बेळगाव
बसवाण गल्ली, शहापूर येथील एका बंद घराचा दरवाजा फोडून सुमारे 4 लाखांचा ऐवज पळविण्यात आला आहे. सोमवारी सायंकाळी चोरीचा हा प्रकार उघडकीस आला असून शहापूर पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
प्रमोद अरविंद मरवे यांच्या घरी चोरीचा प्रकार घडला आहे. त्यांची बहीण वर्षा महेश बराले यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. 3 एप्रिल रोजी कुटुंबीय घराला कुलूप लावून परगावी गेले होते.
सोमवार दि. 25 एप्रिल रोजी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास ते घरी परतले. त्यावेळी चोरीचा प्रकार उघडकीस आला.
चोरटय़ांनी दरवाजा व स्लाईडींग गेटची कडी तोडून तिजोरीतील 10 ग्रॅम सोने, 4 किलो 950 ग्रॅम चांदी, दोन तांब्यांचे हंडे, 1 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 3 लाख 92 हजार रुपये किमतीचा ऐवज पळविला आहे. चोरीचा प्रकार उघडकीस येताच शहापूर पोलिसांना पाचारण करण्यात आले.
पोलीस अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत. शहर व उपनगरांत चोऱया, घरफोडय़ांचे सत्र सुरूच आहे. ऐन सणासुधीच्या काळात चोरटय़ांनी बंद घरे लक्ष्य बनविली आहेत. गुन्हेगारांनी पोलीस दलासमोर तपासाचे आव्हान उभे केले आहे.
सीसीटीव्हीत कैद…
24 एप्रिलच्या मध्यरात्री 2.30 वाजता या परिसरातील एका सीसीटीव्हीत चौघा जणांची छबी कैद झाली आहे. या चौकडीनेच चोरी केली असणार असा संशय बळावला आहे. फुटेजवरून शहापूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.