लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता
प्रतिनिधी /पणजी
राज्यात गेल्या 24 तासांत म्हणजे मंगळवारी कोरोनाचे 7 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढतोय की काय अशी शंका निर्माण झाली आहे. लोकांनी पुन्हा सावध होण्याची गरज असून काळजी घेण्याची आवश्यकता दिसून येत आहे.
सर्व नवीन सात रुग्णांना घरात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. राज्यातील एकूण सक्रिय रूग्णांची संख्या 27 वर पोहचली आहे. मागील काही दिवस रुग्णसंख्या 1 किंवा 2 अशी मिळत होती, तर काही दिवस ती शून्य होती. तथापी काल मंगळवारी एकाच दिवसात 7 नवे रूग्ण आढळल्याने कोरोनाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे.
आतापर्यंत राज्यात एकूण 245395 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातील 241536 जण बरे झाले. अनेक दिवसांपासून कोरोना बळींचे सत्र थांबले असले तरी आतापर्यंत एकूण 3832 जणांचे बळी गेले आहेत. मागीलवर्षी 2021 मध्ये एप्रिल मे महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढला होता, तसा तो पुन्हा वाढतो की काय अशी भीती लोकांत व्यक्त होत आहे.









