मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे लोबो यांना आश्वासन
प्रतिनिधी /पणजी
नोकरीतून कमी करण्यात आलेल्या अंगणवाडी सेविकांना परत घेण्याबाबत फेरविचार करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांना दिले असून त्यासंदर्भातील आदेश रद्द करणार असल्याचे म्हटले आहे.
श्री. लोबो यांनी अंगणवाडी सेविकांच्या शिष्टमंडळासह सावंत यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना वरील माहिती देऊन सांगितले की, त्या सेविकांचे कुटुंब नोकरीवर अवलंबून आहे तेव्हा त्यांच्यावर अन्याय करू नका. निवडणुकीपूर्वी जे झाले ते झाले. आता त्याचा बाऊ न करता कमी केलेल्या सेविकांना कामावर घेण्याची मागणी श्री. लोबो यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. सावंत यांनी महिला-बाल विकास खाते मंत्री-संचालक यांच्याशी चर्चा करतो आणि सेविकांचा प्रश्न सोडवतो, असे स्पष्ट केल्याचे श्री. लोबो यांनी नमूद केले.
अंगणवाडी सेविका या प्रश्नावर कोर्टात जाऊ शकत नाहीत आणि गेल्या तरी वकिलांचा खर्च त्यांना परवडणारा नाही म्हणून मुख्यमंत्री सरकारकडे चर्चा करून हा प्रश्न सुटलेला बरा, असे मत श्री. लोबो यांनी प्रकट केले. एकूण सात सेविकांना संप केला म्हणून नोकरीतून कमी करण्यात आले होते. दरम्यान, त्या सेविका आपल्याकडे आल्या होत्या आणि आमचे चुकले, अशी कबुली त्यांनी दिली होती, असा दावा डॉ. सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
रेंट-अ-बाईक, मानसोपचार रुग्णालयाचे संपकरी कर्मचारी यांचा प्रश्नही लोबो यांनी डॉ. सावंत यांच्याकडे मांडला आणि चर्चा केली. कोणावरही अन्याय होता कामा नये यासाठी काँग्रेस पक्ष प्रयत्नरत असून जनतेच्या प्रश्नावर पक्षातर्फे योग्य तो आवाज उठवणार असल्याचे लोबो म्हणाले.









