अध्याय पंधरावा
सिद्धींबद्दल बोलताना भगवंत म्हणाले, उद्धवा, सर्व सिद्धींचा निर्माता, पालन करणारा आणि प्रभू मीच होय. जीवात्म्याची जी ऐक्मयता, त्या योगाचा खरोखर मी स्वामी आहे. आणखी ज्यात जीवपणाची गोष्ट मिथ्या ठरते, त्या ज्ञानाचाही सर्वस्वी स्वामी मीच आहे.
ज्ञानीजनांना माझ्याच उपदेशाने ज्ञानाचा स्पष्ट बोध होतो. लाटांना जसे पाणी किंवा गुळाला जशी गोडी, त्याप्रमाणे ह्या अनंत कोटी ब्रह्मांडांनाही मी परिपूर्णत्वाने परिपूर्ण व्यापून राहिलो आहे. असा जो मी परिपूर्ण त्या माझ्या पूर्ण प्राप्तीची संधी जवळ जवळ आलेली असताना, भोगविलास व संपत्ती ह्यांच्या सहाय्याने ती संधी सिद्धी हिरावून घेतात. राजापाशी ज्याचे चांगले दळणवळण असते, त्याला सहजासहजी पूर्णपणे लाच खाता येते, पण बहुधा त्यातच त्याला मृत्यु येतो. त्याप्रमाणेच साधकाला सिद्धी घातक आहेत. ह्या अध्यायातील विषयाचे प्रतिपादन करण्याचे कारण हेच की, उद्धवा ! माझ्या प्राप्तीला खरोखर सिद्धी हेच मोठे विघ्न आहे. एकाग्र भजनाने माझी प्राप्ती होण्याची वेळ आली असता त्या संधीला सिद्धी मध्ये येतात आणि त्या भोगांच्या आसक्तीने साधकांना भुरळ घालून नागवून सोडतात. माझे आत्मसुखच जे जाणत नाहीत, असे जे केवळ मूर्ख असतात, त्यांना अत्यंतिक विषय वासनेमुळे ह्या सिद्धीचे मोठे कौतुक वाटते. वेश्येचे जसे हावभाव असतात, तसेच हे सिद्धीचे वैभव आहे. ते सर्व सोडून द्यावे असे सांगण्यासाठी देवांनी हा अध्याय सांगितला. पुढे म्हणाले, ज्याला माझे आत्मसुख प्राप्त होते, त्याला ह्या सिद्धी केवळ कसपटासमान होत. ते जन्ममरणाचे तोंडसुद्धा पहात नाहीत. त्यांच्या अंतःकरणात माझ्याविषयी परिपूर्ण आनंद भरलेला असतो.
सद्गुरूच्या चरणांची सेवा केली असता सर्व परिपूर्ण ब्रह्मच सर्वत्र भरून राहते. तेव्हा सिद्धींना विचारतो कोण ? ही खूण हरिभक्त जाणतात. आपलेपणा हरिभक्तीला विकून टाकतात, भजनाने अहंभाव नाहीसा होतो, अशावेळी सिद्धींच्या उपभोगाची कल्पनाही त्यांच्या मनात कधी येत नाही. भुक्ती, मुक्ती, ऋद्धी, सिद्धी, ह्या खरोखर सद्गुरुचरणांच्याच ठिकाणी आहेत. जे मंदबुद्धी लोक हे जाणत नाहीत, ते अनेक प्रकारच्या सिद्धींची इच्छा करतात.
निरपेक्षता हेच खरोखर सर्व सिद्धीचे साधन आहे हे पक्के लक्षात ठेव. निरपेक्ष असतो त्याच्या अंगणांत सर्व सिद्धी राबत असतात. ज्यांच्या मनात सिद्धींची इच्छा असते, त्यांच्याकडे सिद्धी ढुंकूनसुद्धा पहात नाहीत आणि निरपेक्ष असतो त्याच्या पायांची मातीसुद्धा सिद्धी नेहमी शिरसावंद्य करतात. ज्ञान, वैराग्य आणि भक्ती ह्यांच्याहुनही निरपेक्षता हीच खरोखर अत्यंत श्रे÷ आहे. ती निरपेक्षता हाती आली असता सायुज्यता मुक्तीसुद्धा पायी लागते. निरपेक्षतेपाशीच सर्व सिद्धी असतात, निरपेक्षतेपाशीच सर्व विधी असतात आणि निरपेक्षतेपाशीच समृद्धी रात्रंदिवस चरण वंदीत असते. निरपेक्षता असते तेथेच योगक्षेम असतो.
निरपेक्षता असते तेथेच सद्भाव असतो आणि अहो! निरपेक्षतेपाशीच भगवंताचे स्वरूप खरोखर उभे असते. निरपेक्षतेपाशीच वेदान्त असतो, निरपेक्षतेपाशीच खराखरा योग असतो, निरपेक्षता हाच स्वानंदाचा उपभोग आहे आणि निरपेक्षालाच श्रीकृष्ण सापडतो. नाथबाबा पुढे म्हणतात, एका (एकनाथ ) जनार्दनाला शरण जाऊन त्याचे पवित्र चरण वंदन करताच मला वाढती निरपेक्षता प्राप्त झाली, म्हणून तो आनंदाने सदा सर्वदा परिपूर्ण असतो. आम्हाला स्वानंदाचा आत्मबोध झाला, हा केवळ सद्गुरुचरणांचा प्रसाद होय. श्रीगुरुचरणांच्या ठिकाणीच महासुखाचे लीलाविलास व आनंदाचे मूळ बीज असते. गुरुचरणांची भक्ती केली असता अनायासेच चारही मुक्ती प्राप्त होतात. म्हणूनच गुरुभक्त असतात त्यांची आत्मशांतीसह विरक्ती सेवा करू लागते.
एका जनार्दनाला शरण गेला म्हणून त्याच्या कृपेमुळेच श्रीमद्भागवताच्या निरूपणाचा पंधरावा अध्याय संपूर्ण झाला.
पंधरावा अध्याय समाप्त







