वार्ताहर/ टाळसुरे
दापोली तालुक्यांमधील नवानगर येथे हळदीच्या कार्यक्रमात डीजे लावण्यावरून दोन गटांत झालेल्या तुंबळ हाणामारीत 11 जण जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असून 35जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अशोक माने (42, नवानगर-दापोली) यांनी दापोली पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास त्यांच्या मामांचे निधन झाल्यामुळे ते कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले होते. त्यांच्या घराशेजारी हळदीचा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमामध्ये डीजे सुरू होता. रात्री 10.30 वाजता पोलिसांची गाडी आली आणि त्यांनी डीजे बंद करण्याच्या सूचना केल्या. मात्र आम्हीच याबाबत तक्रार केल्याचा संशय आल्याने सुमारे 20 जणांच्या जमावाने आम्हाला मारहाण केली. त्यावेळी अशोक माने यांच्याबरोबर त्यांचा भाऊ शिवाजी माने, भाचा चेतन नलावडे होते. त्यावेळी मिथुन कुऱहाडे, सूरज कुऱहाडे, कमल कुऱहाडे, सचिन कलकुटकी, मारुती कलकुटकी, संतोष कलकुटकी, चेतन नलावडे, रमेश नलावडे, हरिश्चंद्र नलावडे, प्रणव नलावडे, रुद्र कुऱहाडे, समर्थ कुऱहाडे, मनीषा कलकुटकी, सुनील माने, परशुराम माने, महेंद्र माने, नीला माने, यलक्का कलकुटकी, साहिल नलावडे, अनिल नलावडे (सर्व नवानगर) हे 20 जण संगनमताने जमाव करून कोयती, लोखंडी पाईप, लोखंडी पट्टी, काठी, दगड व कौलांचे तुकडे घेऊन आले आणि शिवाजी माने, चेतन नलावडे, शांता माने, केतन नलावडे, बंडू कलकुटकी यांना मारहाण व शिविगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीमध्ये पाचहीजण जखमी झाले. सर्व जखमींना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध भादंवि कलम 143, 147, 148, 149, 326, 324, 323, 504 व 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निनाद कांबळे करत आहेत.
चेतन नलावडे (31, नवानगर) यांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीनुसार त्यांची बहीण अक्षया हिचे सोमवारी लग्नग्न होते. यामुळे हरिश्चंद्र नलावडे यांच्या घरी मंडप घालण्यात आला होता. त्याठिकाणी रविवारी रात्री हळदीचा कार्यक्रम सुरू होता. रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास अशोक माने, शिवाजी माने, अण्णाप्पा माने, लोकेश माने, दिलीप माने, सतीश माने, केतन नलावडे, चेतन नलावडे, अमोल माने, बंडू कलकुटकी, अनिता माने, जयश्री माने, सौरभ माने, अथर्व माने (सर्व नवानगर) हे संगनमताने जमाव करून लोखंडी पाईप, काठी, चाकू, दगड व कौलांचे तुकडे यांच्या सहाय्याने परशुराम माने, संतोष कलकुटकी, अनिल नलावडे, दिलीप माने, नीला माने, सचिन कलकुटकी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. शिविगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. या फिर्यादीनुसार 15जणांच्या विरुद्ध भादंवि कलम 143, 147, 148, 149, 326, 324, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक निनाद कांबळे करीत आहेत.
दरम्यान, शिवाजी माने यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना अधिक उपचाराकरिता रत्नागिरीला हलविण्यात आल्याचे दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱयांनी सांगितले आहे. अन्य दोघेजण खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत. तिघांना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांनी सांगितले. या गुह्यांमध्ये अल्पवयीन मुले तसेच महिलांचाही सहभाग आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.









