मंगळवारपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता : आंबा, काजू पिकांची होणार नुकसानी, झाडे, घरे तसेच वीज खांबांची पडझड
प्रतिनिधी /पणजी
राजधानी पणजीसह राज्यातील इतर काही भागात रविवारी पहाटे पावसाने जोरदार गडगडाट, विजेचा चमचमाट करीत हजेरी लावली. काही ठिकाणी हलकासा तर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला. दरम्यान हवामान खात्याने मंगळवारपर्यंत पिवळा बावटा जारी केला असून पुढील काही दिवस पावसाचे असतील असेही खात्याने म्हटले आहे.
ताशी 40 ते 50 कि.मी. वेगाने वारे वाहतील, असा अंदाज खात्याने वर्तवला असून समुद्र खवळलेला राहाणार असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये, असेही खात्याने बजावले आहे. लोकांनी गडगडाट – विजांचा चमचमाट चालू असताना सावध राहावे आणि खुल्या जागेत थांबू नये. कोठेतरी आसरा पाहून तिथे थांबावे, अशी सूचना करण्यात आली आहे.
दरम्यान, गोव्यातील तापमान 34 डि.से. नोंद झाले असून त्यात मोठा फरक पडणार नाही परंतु पाऊस पडण्याची चिन्हे व लक्षणे दिसत असल्याचे खात्याने स्पष्ट केले आहे.
आंबा, काजू पिकाची नुकसानी
अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे व हवामानातील बदलामुळे राज्याला रविवारी पहाटे पुन्हा एकदा अवेळी पावसाने दणका दिला. अनेक ठिकाणी झाडे, फांद्या यांची पडझड होऊन त्या घरांवर, वाहनांवर पडल्याने नुकसानी झाली आहे. आंबा, काजू पिकाची देखील या पावसाने नुकसानी केल्याचे सांगण्यात आले.
तिसवाडी, पेडणे, सत्तरी, डिचोली या तालुक्यात पावसाचा मोठा जोर होता तर इतरत्र तो मध्यम स्वरुपात झाला. पहाटे पाऊस पडल्याने त्याचा जनजीवनावर मोठा परिणाम झाला नाही.









