मुंबईवरील विजयाने चेन्नईचे मनोबल उंचावेले, पंजाबही चौथ्या विजयासाठी उत्सुक
वृत्तसंस्था/ मुंबई
चेन्नई सुपरकिंग्स व पंजाब किंग्स यांच्यात सोमवारी आयपीएलमधील लढत होत असून सायंकाळी 7.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. आधीच्या सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मुंबईविरुद्ध शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून आपला जुना करिश्मा दाखवून दिला होता. या संघाच्या विविध विभागात सुधारणा होण्याची गरज असली तरी धोनीकडून पुन्हा एकदा तशा कामगिरीची अपेक्षा केली जात आहे.
चेन्नईने आतापर्यंतच्या सात सामन्यात 2 विजय मिळविले आहेत तर पंजाब किंग्सने तितक्याच सामन्यात 3 विजय मिळविले आहेत. गुणतक्त्यात सध्या पंजाब आठव्या तर सीएसके नवव्या स्थानावर आहे. विद्यमान विजेत्या असलेल्या सीएसकेची या मोसमात सर्वच विभागात सुमार कामगिरी झाली आहे. रविंद्र जडेजाच्या नेतृत्वाखालील या संघाला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ अद्याप तरी करता आलेला नाही. कर्णधार या नात्याने जडेजालाही विशेष चमक दाखविता आलेली नाही. मात्र याआधीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सवर त्यांनी तीन गडय़ांनी विजय मिळविला असल्याने त्यांचे मनोबल या सामन्यावेळी उंचावलेले असेल. धोनीने आपल्यातील फिनिशर अजून ‘फिनिश’ झालेला नाही, हेच या सामन्यात दाखवून दिले होते. मुंबईविरुद्ध शेवटच्या षटकात त्याने दोन चौकार व एक षटकार मारत सामना संपवला होता.
गोलदांजी ही चेन्नईची चिंतेची बाब बनली असली तरी मुंबईविरुद्ध त्यांची चांगली कामगिरी झाली होती. विशेषतः नवोदित पेसर मुकेश चौधरीने 3 बळी घेत लक्षवेधी प्रदर्शन केले. अनुभवी ड्वाईन ब्रेव्होनेही आपली उपयुक्तता पुन्हा सिद्ध करून दाखविताना चेंडू सोपवल्यावर ब्रेकथ्रू मिळवून दिला आहे. जडेजाला फलंदाजी व गोलंदाजीतही फारशी चमक दाखवता आलेली नाही. पण लंकेचा स्पिनर महीश तीक्षणाला सामावून घेतल्याने गोलंदाजीला थोडीशी बळकटी आली आहे. दीपक चहर व ऍडम मिल्नेची उणीव मात्र त्यांना प्रकर्षाने जाणवत आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध फटकावलेल्या 73 धावांचा अपवाद वगळता युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडची कामगिरीही तशी निराशाजनकच झाली आहे. त्याला या सामन्यात आपल्या कामगिरीत सुधारणा करावी लागेल. अष्टपैलू मोईन अली व शिवम दुबे यांनाही जादा जबाबदारी उचलण्याची गरज आहे. चेन्नईच्या प्लेऑफमध्ये पोचण्याच्या आशा अंधुक असल्याने सोमवारच्या सामन्यात पराभव झाल्यास ते एलिमिनेशनच्या उंबरठय़ावर पोहोचतील.
पंजाबला आधीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून तब्बल 9 गडय़ांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आजवरच्या सामन्यांत पंजाबला फलंदाजीतील सातत्याच्या अभावाचा फटका बसला आहे. शिखर धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, शाहरुख खान यासारखे पॉवरहिटर्स त्यांच्याकडे असले तरी त्यांना सातत्य राखण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. जॉनी बेअरस्टो तो खेळलेल्या चारही सामन्यात अपयशी ठरला असल्याने त्याच्या जागी कदाचित लंकेच्या भानुका राजपक्षेला घेतले जाण्याची शक्यता आहे. भानुकाने बेअरस्टोपेक्षा सरस प्रदर्शन केले आहे.
पंजाबकडे गोलंदाजांची बलवान व वैविध्य असलेली फळी असून रबाडा त्यात आघाडीवर आहे. अर्शदीप सिंगनेही चांगली कामगिरी केली असून त्याने जास्त बळी मिळविले नसले तरी किफायतशीर गोलंदाजी केली आहे. वैभव अरोराला मात्र सुधारणा करण्याची गरज आहे. वेगवान गोलंदाज अष्टपैलू ओडियन स्मिथची भूमिका पुन्हा एकदा महत्त्वाची ठरेल. त्याने आतापर्यंतच्या सामन्यात अपेक्षित कामगिरी केलेली नाही.
संभाव्य संघ ः पंजाब किंग्स ः मयांक अगरवाल (कर्णधार), धवन, अर्शदीप सिंग, रबाडा, बेअरस्टो, राहुल चहर, हरप्रीत ब्रार, शाहरुख खान, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, इशान पोरेल, लिव्हिंगस्टोन, ओडियन स्मिथ, संदीप शर्मा, राज अंगद बावा, रिषी धवन, प्रेरक मंकड, वैभव अरोरा, वृत्तिक चटर्जी, बलतेज धांडा, अंश पटेल, नाथन एलिस, अथर्व तायडे, भानुका राजपक्षे, बेनी हॉवेल.
चेन्नई सुपरकिंग्स ः रविंद्र जडेजा (कर्णधार), धोनी, गायकवाड, मोईन अली, ड्वाईन ब्रेव्हो, रायुडू, उथप्पा, सँटनर, ख्रिस जॉर्डन, ऍडम मिल्ने, देव्हॉन कॉनवे, शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, महीश तीक्षणा, राजवर्धन हंगरगेकर, तुषार देशपांडे, केएम असिफ, सी.हरी निशांत, एन. जगदीशन, सुब्रांशू सेनापती, के.भगत वर्मा, प्रशांत सोळंकी, सिमरजीत सिंग, मुकेश चौधरी.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 पासून.









