गुतेरेस यांच्या दौऱयावर भडकले झेलेंस्की ः प्रथम रशियाचा दौरा करण्याचा अर्थ काय?
युक्रेनमध्ये रशियाचे हल्ले सातत्याने सुरू आहेत. रशियाच्या हल्ल्यांदरम्यान विदेशी नेते युद्धग्रस्त देशाचा दौरा करत आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी युद्धादरम्यान सर्वप्रथम युक्रेनचा दौरा केला होता. तर चालू आठवडय़ात संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव एंटोनियो गुतेरेस हे प्रथम रशिया आणि मग युक्रेनचा दौरा करून दोन्ही देशांच्या प्रमुखांशी चर्चा करणार आहेत. गुतेरेस यांच्या दौऱयाला ‘युद्ध रोखण्याचा एक प्रयत्न’ ठरविले जात असले तरीही युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की मात्र संतप्त झाले आहेत.
गुतेरेस यांनी कीव्हपूर्वी मॉस्कोचा दौरा करण्याचा आणि पुतीन यांची भेट घेण्याच्या निर्णयावर झेलेंस्की यांनी टीका केली आहे. युक्रेनपूर्वी रशियाला भेट देणे स्पष्टपणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
युद्ध युक्रेनमध्ये सुरू आहे, मॉस्कोमध्ये रस्त्यांवर मृतदेहांचा खच पडलेला नाही. प्रथम युक्रेनला भेट देत येथील लोकांचे दुःख पाहून हल्ल्याचे परिणाम जाणून घेणे स्वाभविक ठरले असते असे म्हणत झेलेंस्की यांनी गुतेरेस यांच्यावर टीका केली आहे.
युद्ध संपविण्यासाठी पुतीन यांच्यासोबत बैठक व्हावी अशी स्वतःच्या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला आहे. मॉस्को आणि कीव्हपूर्वी गुतेरेस हे तुर्कस्तानची राजधानी अंकारा येथे जाणार आहेत. युद्धात रशियासाठी सर्वात मोठे आव्हान युक्रेनकडून वापरला जाणारा ड्रोन ठरला आहे. बायरकटार टीबी-2 या ड्रोनची निर्मिती तुर्कस्तानने केली आहे हे विशेष.
गुतेरेस हे 26 एप्रिल रोजी मॉस्कोच्या दौऱयावर जाणार आहेत. तेथे ते विदेशमंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यासोबत त्यांची चर्चा होणार आहे. युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाला दोन महिने पूर्ण झाल्यावर ही बैठक होणार आहे.
रशियात राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि युक्रेनमध्ये अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांची भेट घेणार आहे. लोकांचा जीव वाचविणे, मानवी संकट संपुष्टात आणणे आणि युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याची गरज असल्याचे गुतेरेस यांनी ट्विट करत म्हटले आहे.









