वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत टॅटू काढून घेण्याची इच्छा
सद्यकाळात टॅटू काढून घेण्याचा छंद वाढत चालला आहे. आपल्या अवतीभोवती अनेक जणांच्या शरीरावर टॅटू दिसून येतील. केवळ तरुणच नव्हे तर वृद्ध देखील टॅटू काढून घेण्याचे शौकीन आहेत. काही जण स्वतःचा हा छंद वृद्धत्वापर्यंत कायम ठेवू इच्छितात. अशाचप्रकारचा विचार करणाऱया ब्रिटनमधील एका महिलेला वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत स्वतःच्या शरीरावर टॅटू काढून घ्यायचे आहेत.
वेल्स येथे राहणारी 45 वर्षीय मेलिसा स्लोआन ही 7 मुलांची आई असून तिने डोक्यापासून पायांपर्यंत शरीरावर टॅटू काढून घेतले आहेत. तरीही ती अद्याप स्वतःच्या शरीरावर टॅटू काढून घेऊ इच्छिते. वयाच्या 80 व्या वर्षापर्यंत मी टॅटू काढून घेणार असल्याचे तिचे म्हणणे आहे. मेलिसाच्या शरीरावर हृदयाच्या आकारातील टॅटू आहेत. तर तिच्या पायांवर क्रे ट्विन्सचा टॅटू काढलेला आहे.

मेलिसाने वयाच्या 20 व्या वर्षापासून स्वतःच्या शरीराला कॅनव्हासप्रमाणे वापरण्यास सुरुवात केली होती. आता ती 7 मुलांची आई असली तरीही तिचे हे टॅटूप्रेम कमी झालेले नाही. रस्त्यावर मी चालत असताना लोक माझ्याकडे वळून बघत असतात. जेव्हा मी सुपरमार्केट किंवा अन्यत्र असते तेव्हा लोक पाहतच राहतात, आता मला या अटेंशनची सवय झाल्याचे मेलिसा सांगते.
काही लोक माझ्या टॅटूचे कौतुक करतात. परंतु अनेक जण अखेर इतके टॅटू का काढून घेतले आणि स्वतःच्या शरीरासोबत असे का केले अशी विचारणा करत असतात. काही दिवसांपूर्वी मी एका मेळय़ात गेली होती, तेव्हा लोक माझ्याकडे मी एखादी सेलिब्रिटी असल्याप्रमाणे पाहत होते असे तिने म्हटले आहे.









