आजपासून तीन दिवस भरगच्च कार्यक्रम
प्रतिनिधी/ पणजी
पणजी भोवतालच्या परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सांतइनेज पणजी येथील जागृत श्रीवाठारेश्वर संस्थानात श्रीमूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा आजपासून प्रारंभ होत आहे.
सुमारे 80 वर्षे जुने आणि एका घुमटीवजा असलेल्या जागेत आज भव्य मंदिर उभारण्यात आले असून तेथे श्रीवाठारेश्वरासह श्रीलिंग व नंदी यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापन करण्यात येणार आहेत. त्यानिमित्त तीन दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थान समितीतर्फे शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत अध्यक्ष मंगलदास नाईक यांनी ही माहिती दिली. त्यावेळी सचिव हेरंब प्रभुदेसाई, खजिनदार महेश कांदोळकर, कार्यकारी सदस्य शांताराम नाईक, कृष्णनाथ चोपडेकर, गुरुदास काणकोणकर यांची उपस्थिती होती.
आज दि. 24 रोजी सकाळी प्रतिष्ठांग प्रायच्छित, सायं. 3.30 वाजता शहरातील श्रीमहालक्ष्मी मंदिराकडून मूर्तींची भव्य दिंडी मिरवणूक काढण्यात येईल. ही मिरवणूक संपूर्ण आल्तिनो परिसराला वळसा घालून सायं. 5.30 वाजता मंदिरस्थळी पोहोचल्यानंतर सुहासिनींकडून ओवाळणी होईल. त्यानंतर मूर्तींचे मंदिरात आगमन होईल. सायं. 6 वाजता राक्षोग्नविधान पूर्वदेवता नमन, विसर्जन प्राकार बलिदान, पूर्णाहुती, आरती व ब्राह्मणभोजनाने समाप्ती होईल.
दि. 25 रोजी सकाळी सामुहिक प्रार्थना, गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृका पूजन, देवानांदी, समराधना, अंकुरार्पण, आचार्यवरण, मधुपर्क पूजा, माणिक विधी, प्राकारशुद्धी, मंडप प्रवेश, मंडप प्रतिष्ठापना, मुख्य देवता स्थापना पूजन, सप्ताविधास, जलाधिवास, सग्रह वास्तुशांती, आदी विधी करण्यात येतील.
दुपारी महाप्रसाद, सायंकाळी स्तोत्र पठण, आरती व रात्री सांतिनेज येथील श्रीवाठारेश्वर महिला नाटय़मंडळातर्फे निर्मित ’आकू आमचें डाकू’ या दोन अंकी कोकणी नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे.
मंगळवार दि. 26 रोजी सकाळी देवता पूजन, हवन, सकाळी 11.03 मि. या शुभमुहुर्तावर श्रींची प्रतिष्ठापना, तसेच स. 11.40 वाजता शिखर कलश प्रतिष्ठापना करण्यात येईल. सायंकाळी संगिताचा कार्यक्रम होणार असून त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याहस्ते विविध मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे.
सर्व भाविकांनी उपस्थित राहून तिन्ही दिवसांचे कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.









