विराट कोहलीवर सलग दुसऱयांदा गोल्डन डकची नामुष्की, सनरायजर्स हैदराबादचा 9 गडी राखून एकतर्फी विजय
मुंबई / वृत्तसंस्था
विराट कोहली सलग दुसऱयांदा पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर प्रचंड पडझडीला सामोरे जावे लागलेल्या आरसीबीला शनिवारी आयपीएल साखळी सामन्यात 9 गडय़ांनी एकतर्फी पराभवाचा दणका सोसावा लागला. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर आरसीबीचा डाव 16.1 षटकात सर्वबाद 68 धावांमध्येच आटोपला तर प्रत्युत्तरात सनरायजर्स हैदराबादने 8 षटकात 1 बाद 72 धावांसह एकतर्फी, सहज विजयावर शिक्कामोर्तब केले. आयपीएल इतिहासात ही सहावी सर्वात निचांकी धावसंख्या ठरली.
सनरायजर्स हैदराबादतर्फे मार्को जान्सनने (4 षटकात 3-25) दुसऱयाच षटकात 3 गडी बाद करत खळबळ उडवली आणि यातून आरसीबीला अखेरपर्यंत सावरता आले नाही. जान्सनला उमरान मलिक (1-13), टी. नटराजन (3-10) यांनी समयोचित साथ लाभली. पेस-स्विंग-सीमचा उत्कृष्ट मिलाफ साधत हैदराबादचे गोलंदाज येथे कमालीचे यशस्वी ठरले.
विजयासाठी 69 धावांचे अतिशय किरकोळ आव्हान असताना सनरायजर्स हैदराबादला यासाठी 8 षटके पुरेशी ठरली. अभिषेक शर्माने 28 चेंडूत 47 धावांची आतषबाजी केली तर केन विल्यम्सन 17 चेंडूत 16 धावांवर नाबाद राहिला. या विजयासह हैदराबादने गुणतालिकेत दुसऱया स्थानी झेप घेतली असून आरसीबीचा संघ या पराभवानंतरही तिसऱया स्थानी कायम आहे.
आरसीबी हा पराभव शक्य तितक्या लवकर विसरण्यासाठी जरुर प्रयत्नशील असेल. पण, विराट कोहलीचा खराब फॉर्म ही या प्रँचायझीची मुख्य डोकेदुखी ठरत आली आहे. जागतिक क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांपैकी एक असलेल्या विराटला असे हतबल होताना पाहणे आरसीबीसाठी अर्थातच खेददायी राहिले आहे. काही वर्षांपूर्वी जेम्स अँडरसनने कोहलीचा बचाव भेदण्याचे जे कसब दाखवले, त्याचीच पुनरावृत्ती अलीकडील कालावधीत दुष्मंता चमीरा, मार्को जान्सन करत आले आहेत. विराट ऑफ स्टम्पवरील चेंडू खेळताना अडखळू शकते, ही बाब जागतिक स्तरावरील गोलंदाजांसाठी पर्वणी ठरत असल्याचे चित्र आहे.
संक्षिप्त धावफलक
आरसीबी ः 16.1 षटकात सर्वबाद 68 (सुयश प्रभुदेसाई 15, ग्लेन मॅक्सवेल 12. अवांतर 12. टी. नटराजन 3 षटकात 10 धावात 3 बळी, मार्को जान्सन 4 षटकात 25 धावात 3 बळी, जगदीश सुचिथ 2-12, भुवनेश्वर, उमरान मलिक प्रत्येकी 1 बळी).
सनरायजर्स हैदराबाद ः 8 षटकात 1 बाद 72 (अभिषेक शर्मा 28 चेंडूत 8 चौकार, 1 षटकारासह 47, केन विल्यम्सन 17 चेंडूत नाबाद 16, राहुल त्रिपाठी 3 चेंडूत नाबाद 7. अवांतर 2. हर्षल पटेल 1-18).
2017 मध्ये 23 एप्रिललाच आरसीबीवर सर्वबाद 49 ची नामुष्की!
5 वर्षांपूर्वी कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर झालेल्या आयपीएल साखळी सामन्यात आरसीबीवर अवघ्या 49 धावात डाव गुंडाळला जाण्याची नामुष्की आली होती आणि ती लढत 23 एप्रिलला झाली होती. आता 5 वर्षांच्या कालावधीनंतर पुन्हा एकदा 23 एप्रिललाच झालेल्या लढतीत आरसीबीला सर्वबाद 67 धावांवर डाव गुंडाळला जाण्याची नामुष्की सोसावी लागली.
जान्सनचा तेजतर्रार मारा आणि आरसीबी दुसऱया षटकाअखेर 3 बाद 8!
डावखुरा जलद गोलंदाज जान्सनने डावातील दुसऱयाच षटकात चक्क 3 धक्के देत आरसीबीला अपयशाच्या खाईत लोटले आणि त्यातून हा संघ शेवटपर्यंत सावरला नाही. जान्सनने दुसऱया चेंडूवर प्लेसिस (5), तिसऱया चेंडूवर विराट (0) व पाचव्या चेंडूवर अनूज रावतला (0) बाद करत आरसीबीची दुसऱया षटकाअखेर 3 बाद 8 अशी दाणादाण उडवली.









