तुर्कस्तानचा दावा :इस्तंबूलमध्ये होणार पुतीन अन् झेलेन्स्की यांची भेट
वृत्तसंस्था / अंकारा
युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाला 60 हून अधिक दिवस झाले असून अद्याप दोन्ही देशांमधील युद्ध सुरूच आहे. याचदरम्यान तुर्कस्तानने मोठा दावा केला आहे. 48 तासांच्या आत रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेन्स्की यांची इस्तंबूलमध्ये भेट होणार असल्याचे तुर्कस्तानने म्हटले आहे.
पुढील 48 तासांमध्ये रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. दोन्ही देशांचे प्रमुख लवकरच भेटून समस्या सोडवतील. आम्ही दोन्ही देशांच्या नेत्यांच्या संपर्कात आहोत, असे उद्गार तुर्कस्तानचे अध्यक्ष तैयप एर्दोगान यांनी काढले आहेत.
याचदरम्यान संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव एंटोनियो गुतेरेस हे मंगळवारी मॉस्कोच्या दौऱयावर जाणार आहेत. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांची ते भेट घेणार आहेत. पुतीन आणि गुतेरेस यांच्यात मंगळवारी मॉस्कोमध्ये बैठक प्रस्तावित आहे. गुतेरेस हे रशियाचे विदेशमंत्री सर्गेई लावरोव्ह यांचीही भेट घेणार असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.
रशियाच्या दौऱयानंतर गुतेरेस हे गुरुवारी युक्रेनमध्ये जाणार आहेत. अध्यक्ष झेलेंस्की यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. गुतेरेस यांनी मागील आठवडय़ात रशिया आणि युक्रेनला पत्र लिहून भेटीचे आवाहन केले हेते.
तैवानकडून युक्रेनला मदत
रशिया-युक्रेन युद्धात चीन रशियाला मदत करतोय, तर तैवानने युक्रेनला समर्थन दर्शवत सुमारे 8 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 611 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. या निधीचा वापर युक्रेनमध्ये रुग्णालये आणि वैद्यकीय सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी केला जाणार आहे.
दूतावासाबद्दल विचार
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये अमेरिकेचा दूतावासा पुन्हा सुरू करण्यासंबंधी विचार केला जात असल्याचे संकेत दिले आहेत. तर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कीव्हमधील दूतावास पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. रशियाकडून आक्रमण करण्यात आल्यावर ब्रिटनने कीव्हमधील स्वतःचा दूतावास बंद केला होता.









