शेततळय़ांच्या निर्मितीसाठी मत्स्य खात्याची विशेष योजना
प्रतिनिधी /बेळगाव
शेततळे आणि नापीक जमिनीतून उत्पन्न मिळवून देण्यासाठी मत्स्य विभागातून विशेष योजना लागू केली आहे. या योजनेचा लाभ घेऊन शेतकऱयांनी मत्स्यपालनाला चालना द्यावी, असे आवाहन मत्स्य विभागाने केले आहे.
केंद्र सरकारच्या पीएमएमएसवाय योजनेंतर्गत मत्स्य पालनासाठी अनुदान उपलब्ध करून दिले जाते. या अंतर्गत नापीक जमिनीत देखील शेततळय़ाची निर्मिती करून मत्स्यपालन करता येते. अलीकडे नापीक जमिनीचे क्षेत्र वाढले आहे. दरम्यान जिल्हय़ातील कृष्णा, घटप्रभा, मलप्रभा आदी नदीपात्राजवळील 64 हजार हेक्टर क्षेत्र नापीक बनले आहे. त्यामुळे सध्या ही जमीन पडिक आहे. अशा क्षेत्रात रोजगार हमी योजनेंतर्गत तलावाची खोदाई करून मत्स्य पालनातून उत्पन्न मिळविता येते.
जिल्हय़ात नापीक (पडिक) जमीन अधिक आहे. अशा जमिनीत मत्स्य खात्याच्या विशेष योजनेंतर्गत तलावाची निर्मिती करून आर्थिक लाभ मिळविता येतो. अलीकडे पडिक जमिनीत मत्स्यतळे निर्माण करणाऱयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे जिल्हय़ात मत्स्य उत्पादनातदेखील वाढ झाली आहे. शेत तलाव आणि पडिक जमिनीत तलावाची निर्मिती करून वर्षाला 10 हजार टन मत्स्य उत्पादन होऊ शकते. गतवर्षात विशेष योजनेतून तब्बल 110 तलावांची निर्मिती झाली आहे. उन्हाळय़ात या तलावांची निर्मिती केली जाते. तर पावसाळय़ात पाण्याने तलाव भरल्यानंतर मत्स्यबीज सोडले जाते. दरम्यान मत्स्य खात्याकडून मत्स्यबीज देखील सवलतीच्या दरात पुरविले जाते. त्यामुळे मत्स्यपालन अलीकडे जोमाने सुरू असल्याचे दिसत आहे.
मत्स्यपालनासाठी पुढे यावे…
बारमाही पाणी असणाऱया शेतकऱयांबरोबर पडिक जमीन असणारेदेखील मत्स्यपालन करून अर्थार्जन करू शकतात. यासाठी मत्स्य खात्याच्या विशेष योजनेचा लाभ घेऊन पडिक जमिनधारकांनी मत्स्यपालनासाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
– एस. कुलकर्णी (उपसंचालक, मत्स्यपालन खाते)









