प्रतिनिधी /पणजी
हवामानात कमालीचा बदल झाला असून एप्रिल महिन्यामध्ये 1989 नंतर प्रथमच गोव्यातील उष्णतेने कहर केला. शुक्रवारी पारा तब्बल 36.2 डिग्री से. पर्यंत पोहोचला आणि असह्य उकाडय़ाने अंगाची लाही लाही झाली.
हवामान खात्याने राज्यात पुढील आणखी दोन दिवस पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पणजी वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात एप्रिलमध्ये सर्वसाधारणपेक्षा 2.3 डिग्री सेल्सिअस तापमान जादा झाले आहे. यामुळेच शुक्रवार हा अतितापदायक दिवस ठरला.
हवामान खात्याने शुक्रवारी सायंकाळी जारी केलेल्या माहितीनुसार पावसाची शक्यता शुक्रवारसह पुढील दोन दिवसांसाठी व्यक्त केली आहे. राज्यातील काही भागात शुक्रवार सायंकाळी उशिरा विजांच्या गडगडाटासह पाऊस पडला. आजही पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर तापमान वाढण्याची शक्यता आहे.









