सलग 4 विजयांमुळे सनरायजर्सचे मनोबल उंचावलेले, उमरान-भुवनेश्वर विरुद्ध दिनेश कार्तिक-प्लेसिस जुगलबंदीची प्रतीक्षा
मुंबई / वृत्तसंस्था
सनरायजर्स हैदराबादचा संघ आज (शनिवार दि. 23) आयपीएल साखळी सामन्यात आरसीबीविरुद्ध भिडेल, त्यावेळी उमरान मलिकची वेगवान गोलंदाजीची क्षमता आणि भुवनेश्वरचे सातत्य प्रतिस्पर्धी दिनेश कार्तिकची विस्फोटकता आणि फॅफ डय़ू प्लेसिसच्या तंत्रशुद्ध खेळाला लगाम घालू शकणार का, हे स्पष्ट होईल. मलिकने यंदा आपल्या तेजतर्रार माऱयाच्या बळावर लक्ष वेधून घेतले असून या माध्यमातून तो श्रेयस अय्यरसारख्या अव्वल फलंदाजाला पेचात टाकण्यातही यशस्वी झाला आहे. आजची आरसीबी-हैदराबाद लढत सायंकाळी 7.30 वाजता होत आहे.
अनुभवी संघसहकारी भुवनेश्वरसह 22 वर्षीय उमरान मलिकने पंजाब किंग्सविरुद्ध मागील लढत 7 गडय़ांनी जिंकून दिली असून सनरायजर्सचा संघ चौथ्या स्थानी पोहोचण्याची महत्त्वाकांक्षा राखून आहे. टी. नटराजन व दक्षिण आफ्रिकन मार्को जान्सन हे यॉर्कर स्पेशालिस्ट संघात असल्याने सनरायजर्स धोकादायक ठरु शकतात. यापैकी जान्सन आपल्या वैविध्यपूर्ण माऱयाच्या बळावर प्रतिस्पर्ध्यांना सातत्याने अडचणीत आणण्यात यशस्वी ठरला आहे. मात्र, प्लेसिस व कार्तिक यांचा खेळ अशा आव्हानात्मक परिस्थितीतच अधिक बहरतो, हा इतिहास असल्याने आजची लढत रंजक ठरेल.
यापूर्वी लखनौविरुद्ध मागील लढतीत टॉप ऑर्डर स्वस्तात परतल्यानंतरही प्लेसिसने 64 चेंडूत 96 धावांची आतषबाजी करत सामन्याला कलाटणी दिली होती. त्यावेळी प्लेसिसचे शतक पूर्ण होऊ शकले नाही. मात्र, आरसीबीने 18 धावांनी विजय संपादन केला होता.
संभाव्य संघ
सनरायजर्स हैदराबाद ः केन विल्यम्सन (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, एडन मॅरक्रम, निकोलस पूरन, अब्दुल समद, प्रियम गर्ग, विष्णू विनोद, ग्लेन फिलीप्स, आर. समर्थ, शशांक सिंग, वॉशिंग्टन सुंदर, रोमारिओ शेफर्ड, मार्को जान्सन, जे. सुचिथ, श्रेयस गोपाल, भुवनेश्वर कुमार, सीन ऍबॉट, कार्तिक त्यागी, सौरभ तिवारी, फझलहक फारुकी, उमरान मलिक, टी. नटराजन.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर ः फॅफ डय़ू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, वणिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हॅझलवूड, शाहबाज अहमद, अनूज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, शेरफेन रुदरफोर्ड, जेसॉन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभुदेसाई, चमा मिलिंद, अनिश्वर गौतम, कर्ण शर्मा, डेव्हिड विली, रजत पाटीदार, सिद्धार्थ कौल.
सामन्याची वेळ ः सायं. 7.30 वा.
विराटला सूर सापडण्याची आरसीबीला प्रतीक्षा
आयपीएल इतिहासात आपली सर्वोत्तम लीग अनुभवत असलेल्या दिनेश कार्तिकने आरसीबीतर्फे सेंटर स्टेज गाजवले असून हाच धडाका त्याने आजही कायम राखला तर यात आश्चर्याचे कारण असणार नाही. मात्र, अनुभवी विराट कोहलीला सूर सापडणे या संघासाठी विशेष महत्त्वाचे असणार आहे.
दिनेश कार्तिकने यापूर्वी 7 डावात अनुक्रमे नाबाद 32, नाबाद 14, नाबाद 44, नाबाद 7, 34, नाबाद 66 व नाबाद 13 असे योगदान दिले असून हंगामातील सर्वोत्तम फिनिशर्समध्ये त्याचा प्राधान्याने समावेश राहत आला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध 66 धावांच्या खेळीचा अपवाद वगळता सातत्याने अपयशी ठरत आलेल्या अनूज रावतला आज सूर सापडणार का आणि गोव्याचा सुयश प्रभुदेसाई, ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल धावांची आतषबाजी करणार का, हे पहावे लागेल.
त्या तुलनेत आरसीबीची गोलंदाजी लाईनअप मात्र भक्कम आहे. जोश हॅझलवूड सातत्यपूर्ण गोलंदाजीच्या बळावर प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत टाकत आला असून त्याच्यासह हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, वणिंदू हसरंगा असे 4 मॅचविनर्स आरसीबीकडे आहेत. हैदराबादचा संघ येथे विजय संपादन केल्यास चौथ्या स्थानी पोहोचू शकेल तर आरसीबी विजयी ठरल्यास ते टॉपवर पोहोचू शकतील.









