जागतिक संकेताचा प्रभाव : सेन्सेक्स 714 अंकांनी नुकसानीत
वृत्तसंस्था / मुंबई
मागील दोन दिवसांच्या सत्रात भारतीय शेअर बाजारात तेजीला अखेर सप्ताहातील अंतिम सत्रात शुक्रवारी पूर्ण विराम मिळाला आहे. यामध्ये जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतामुळे मुख्य कंपन्यांचे समभाग नुकसानीत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज यासारख्या कंपन्यांच्या समभागांमध्ये विक्री राहिल्याने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 714.53 अंकांनी प्रभावीत होत 57,197.15 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 220.65 अंकांनी घसरुन निर्देशांक हा 17,171.95 वर बंद झाला आहे.
मुख्य कंपन्यांच्या कामगिरीत सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये स्टेट बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, इंडसइंड बँक, डॉ. रेड्डीज लॅब, ऍक्सिस बँक, बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिस यांचे समभाग मोठय़ा नुकसानीसह बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, भारती एअरटेल, मारुती सुझुकी, आयटीसी, एशियन पेन्ट्स व एचसीएल टेक यांचे समभाग लाभासह बंद झाले आहेत.
जागतिक पातळीवरील बाजारांमध्ये टोकीयो, हाँगकाँग व सोल यांचे समभाग नुकसानीत आहेत. तर शांघाय हा तेजीसह बंद झाला आहे. तर युरोपीय व अमेरिकन बाजारात घसरण सत्र राहिले आहे.
का झाला अस्थिर बाजार?
विदेशी संस्थांकडून करण्यात आलेली गुंतवणूक व देशातील संस्थांकडून करण्यात आलेल्या गुंतवणुकीदरम्यान झालेल्या लिलावामुळे बाजारात नकारात्मक स्थिती निर्माण झाल्याचे अभ्यासकांचे मत आहे. यामध्ये विदेशी गुंतवणूकदारांकडून जवळपास 713.69 कोटी रुपयाच्या मूल्याच्या समभागांची विक्री झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्चे तेल 1.60 टक्क्यांनी घसरुन 106.6 डॉलर प्रती बॅरेलवर राहिले आहे.








