शांतता समितीच्या बैठकीत अधिकाऱयांची सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
शिवजयंती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी शहापूर पोलीस स्थानकात शांतता समितीची बैठक झाली. या बैठकीत मिरवणूक वेळेत सुरू करण्याची सूचना पोलीस अधिकाऱयांनी केली.
शहापूरचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर यांनी मार्गदर्शन केले. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूर विभागाचे अध्यक्ष नेताजी जाधव, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, राजू बिर्जे, विजय भोसले, रमेश सोनटक्की, प्रशांत भातकांडे, अशोक चिंडक आदींसह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते.
पोलीस अधिकाऱयांनी शिवजयंती उत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱयांकडून मिरवणुकीसंबंधी माहिती घेतली. याचवेळी बसव जयंती व रमजान आहे. त्यामुळे मिरवणूक लवकर सुरू करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षकांनी केले. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. मिरवणुकीसंबंधी लागणारे परवाने देण्याची व्यवस्था करण्यात येईल, असेही पोलीस निरीक्षकांनी सांगितले.









