म. ए. युवा समितीची रेल्वे अधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव शहरात मागील शेकडो वर्षांपासून मराठा लाईट इन्फंट्रीचे मुख्यालय आहे. या इन्फंट्रीसाठी इंग्रजांच्या काळात बेळगाव रेल्वे स्थानक उभारले होते. मराठी इन्फंट्री ही छत्रपती शिवाजी महाराज यांना केंद्रबिंदू मानून मार्गक्रमण करते. बेळगाव रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण केले जात असून, या रेल्वे स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने रेल्वे अधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली.
रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करताना स्थानकावर काही शिल्प लावण्यात आले आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प नव्हते. त्यामुळे शिवभक्तांमधून याबद्दल नाराजी व्यक्त होत होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प बसवून स्थानकाला नाव देण्याची मागणी युवा समितीने केली. सदर निवेदन रेल्वेमंत्री अश्विन विश्वास तसेच नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱयांना पाठविले. स्टेशन मॅनेजर पी. नागराज यांनी निवेदन स्वीकारून नैर्त्रुत्य रेल्वेकडे ते पाठवून देवू, असे आश्वासन दिले.
स्थानकात मराठीलाही स्थान द्या
बेळगाव परिसरात निम्म्याहून अधिक मराठी भाषिक आहेत. स्थानकात लावण्यात येणारे फलक हे इंग्रजी अथवा कन्नड भाषेत लावले जात असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. बेळगावमधून मिरज, पुणे, मुंबई येथे प्रवास करणारे अनेक मराठी भाषिक आहेत. त्यामुळे इतर भाषेसह मराठीतही फलक लावावेत, अशी मागणी केली.
यावेळी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष सूरज कुडुचकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, मनोहर हुंदरे, दिलीप बैलूरकर, विनायक कावळे, संतोष कृष्णाचे, प्रवीण रेडेकर, संभाजी शिंदे, सुधीर शिरोळे, प्रकाश हेब्बाजी, दत्तात्रेय पाटील, इंद्रजीत धामणेकर, मनोज पाटील, विजय जाधव, किरण मोदगेकर व कार्यकर्ते उपस्थित होते.









