मनपाकडून हालचाली, बँकेचे स्थलांतर करण्याची सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
मध्यवर्ती बसस्थानकासमोर असलेल्या महापालिका व्यापारी संकुलाच्या पहिल्या मजल्याची इमारत जीर्ण झाली आहे. परिणामी इमारतीच्या छताचा गिलावा आणि भिंती धोकादायक बनल्या आहेत. त्यामुळे पहिला मजला हटवून नव्याने बांधकाम करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. पण पहिल्या मजल्यावरील बँकेचे स्थलांतर झाले नसल्याने हे काम रखडले आहे. पहिल्या मजल्याचे बांधकाम हटविण्याच्यादृष्टीने बँक स्थलांतर करण्याची सूचना महापालिकेच्यावतीने करण्यात आली आहे.
महसूल वाढविण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहर आणि उपनगरात ठिकठिकाणी व्यापारी संकुलांची उभारणी करण्यात आली आहे. मध्यवर्ती बसस्थानकासमोरील जागेत 1985 मध्ये व्यापारी संकुलाची उभारणी करण्यात आली होती. पण सदर व्यापारी संकुलाच्या पहिल्या मजल्याची इमारत कमकुवत बनली आहे. इमारतीचे छत खराब झाले असल्याने पावसाळय़ात पाणी गळते. तसेच छताचा गिलावा कोसळत असून काही भिंतीदेखील खराब झाल्या आहेत. एकंदर इमारतीची दुरवस्था झाल्याने धोकादायक बनली आहे. इमारतीचा पहिला मजल्याची इमारत जीर्ण झाल्याने महापालिकेच्यावतीने पाहणी करण्यात आली होती. तसेच पहिला मजला हटवून नव्याने बांधकाम करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
त्यानुसार गाळेधारकांना नोटीस बजावून सात दिवसात रिकामी करण्याची सूचना करण्यात आली होती. पण काही गाळेधारकांनी गाळे रिकामी करून दिले तर काही गाळेधारकांनी गाळे रिकामी केले नाहीत. त्यामळे महापालिकेच्यावतीने गाळे रिकामी करून ताबा घेतला होता. मात्र बँकेच्या गाळय़ाचा ताबा घेतला नव्हता. तर बँकेच्या व्यवस्थापन मंडळाला नोटीस पाठवून बँकेचे स्थलांतर करण्याची सूचना केली होती. पण स्थलांतर झाले नसल्याने पहिला मजला हटविण्याचे काम रखडले आहे. पण सध्या इमारतीचा पहिला मजला हटविण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबत बँक व्यवस्थापन मंडळाला दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे. इमारतीचे स्थलांतर झाल्यानंतर व्यापारी संकुलातील पहिला मजला हटविण्याची कारवाई मनपाच्यावतीने करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









